देशात एकीकडे करोना संकट असताना निवडणुकांवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. धडा न घेता आपण निवडणुका, कुंभमेळा, राजकारणात गुंतलो अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. करोना आजारातून मानसिक आजार निर्माण झाला आहे. त्या मानसिक आजारावर काय उत्तर आहे याची कोणाला कल्पना नाही. त्यात गोव्याच्या निवडणुका लागल्या, मुंबई पालिकेच्या निवडणुका लागल्यात हे ऐकल्यावर वीट येतो अशा शब्दांत राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत ते बोलत होते.

आता बांगलादेशही आपल्याला सीमा बंद केल्याचं सांगतो; राज ठाकरे केंद्रावर संतापले

“जगावर संकट आलं आहे त्याची कोणालाच कल्पना नव्हती. फक्त आपणच चुकीच्या अंगाने हाताळलं असं नाही, अमेरिका आणि युरोपमधील देशांकडूनही चुका झाल्या. फक्त ते लवकर वठणीवर आले पण आपण अजूनही आलो नाही. मागच्यास ठेस पुढचा शहाणा तसं आपल्याकडे झालं नाही. इंडियन मेडिकल काऊन्सिलने दुसरी लाट येणार सांगितलं असताना आपला देश अलर्ट राहिला नाही. आपले राजकारणी, सत्ताधारी अलर्ट राहिले नाहीत. त्यामुळे २०२० पेक्षा २०२१ भयानक आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

“भारतात जाऊ नका असं चित्र जगात निर्माण झालं आहे. याप्रकारे आपल्या देशाची नाचक्की व्हावी यासारखं दुर्दैव नाही. आपण दुसरीकडून धडा नाही घेतला. आम्ही निवडणुका, कुंभमेळा, राजकारणात गुंतलो,” अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.

Cyclone Tauktae : गुजरात दौऱ्यावरुन राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…

अस्थिर मन स्थिर होण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं
“इथे लोक स्थिर नाहीत, मानसिकता तशी नाही आणि निवडणुकीचे विचार होत आहेत. यामधून काय साधत आहोत हे समजत नाही. समाज राहिला तर निवडणुका आहेत. लोक मनाने स्थिर असतील तर निवडणुका घेण्यात अर्थ आहे, अन्यथा त्यांचं काय करायचं. अस्थिर मन स्थिर होण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न होणं गरजेचं आहे. हे प्रयत्न राजकारण्यांकडून होतील अशी सर्वात मोठी अपेक्षा आहे. समाज स्थिर कसा होईल यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. जर त्यांनी तो प्रयत्न केला नाही तर राजकारणी होते तर तसेच राहतील,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राजकारणी बदलतील असं वाटत नाही
“राजकारणी बदलतील असं वाटत नाही पण समाज बदलेल. राजकारणी बदललेत की नाही हे काही दिवसांनी समजेल. पण समाजाकडे पाहत असताना, विविध क्षेत्रातील लोकांना पाहत असताना लोक खूप धास्तावलेली आहेत. खूप चिंतेत आहेत. शालेय शिक्षण, शाळा बंद, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून असंख्या लोकांच्या जाण्याच्या मार्गावर आहेत, माणसं भेटत नाहीत. घऱी बसून सर्व गोष्टी कराव्या लागतात. ६५ ते ७० वयाच्या पुढील लोक जास्त भांबावलेले दिसतात. आरोग्यविषयक त्यांना खूप भीती वाटत आहे. अनेक लोक वर्षभरापासून घऱाबाहेर पडलेले नाहीत,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

मास्क घालण्याला तुमचा विरोध आहे का?
“जर घरातच राहायचं आहे तर तोंडाला पट्टी का बांधावी? बाहेर कुठे फिरणं नसताना मास्क लावून काय करायचं? ज्यांनी मास्क लावले त्यांना करोना झाला नाही असं म्हणणं आहे का? मी मास्क लावला काय आणि नाही लावला काय. मध्यंतरी मला हाताच्या आणि पायाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात जावं लागलं तेव्हा मास्क लावला होता. मला तिरस्कार नाही पण गुदरमल्यासारखं होतं. शिवाजी पार्कात अनेकदा लोक मास्क लावून धावत होते. मी म्हटलं एक तर धावू नका किंवा मास्क लावू नका. कुठेतरी बेशुद्ध होऊन पडाल. त्यामुळे मास्क लावण्यास माझा विरोध आहे असं काही नाही,” असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.