News Flash

Cyclone Tauktae : गुजरात दौऱ्यावरुन राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका; म्हणाले…

तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, गुजरात दौऱ्यावरुन राज ठाकरेंची मोदींवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौते चक्रीवादळानंतर फक्त गुजरातचा दौरा केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. देशाचे पंतप्रधान असल्याने त्यांनी असं डावं, उजवं करुन चालणार नाही अशा शब्दांत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा भविष्यवेध घेण्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’कडून आयोजित ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूर-संवादमालिकेत ते बोलत होते.

“केंद्रावर टीका करायची तेव्हा सडकून केली. ज्यावेळी चांगल्या होताना दिसल्या तेव्हा अभिनंदनाचे ट्विटही केले. मग ३७० कलम असो किवा राम मंदिराचा विषय असो. जे चुकीचं आहे ते चूक आणि योग्य ते योग्य सांगण्याची गरज आहे. आपल्याकडे वादळ आल्यानंतर भारताचे पंतप्रधान मोदी गुजरातला गेले याचं वाईट वाटलं. गुजरातलाही नुकसान झालंच, पण तिथे त्यांनी जे केलं ते गोव्यात, महाराष्ट्रातही झालं असतं तर आनंद झाला असता. ते आमचे, देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे असं डावं, उजवं करुन चालणार नाही,” असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

रेमडेसिविर किंवा लस काही जीएसटी नाही
“ब्रुक फार्माचे संचालक ते सर्व अटक प्रकरण होण्याच्या एक आठवडा आधी माझ्याकडे आले होते. त्यांनी आमच्याकडे १७ हजाराचा स्टॉक असून तो निर्यात करणार असल्याचं सांगितलं होतं. केंद्राकडे परवानगी मिळाली तर १७ हजाराचा स्टॉक देऊ शकतो तसंच दिवसाला २० हजार इंजेक्शन निर्मिती करुन देऊ शकतो असं म्हणाले. माझ्या ओळखीच्या लोकांना सांगून दिवसाला एक दीड लाख इंजेक्शन देऊ शकतो असं त्यांनी सांगितलं होतं. मग ते सगळं प्रकऱण झालं आणि केंद्राने रेमडेसिविर आम्ही पुरवू सांगितलं. आता हे रेमडेसिविरचे प्रश्न राज्यं पाहतील. राज्यातील कंपन्यांशी बोलतील. लसींचंही राज्यांनी पाहिलं असतं. रेमडेसिविर किंवा लस काही जीएसटी नाही जो केंद्राने गोळा करुन वाटावा. केंद्राने खरं तर राज्यं बरोबर काम करत आहे की नाही हे पाहिलं पाहिजे,” असा सल्लाच राज ठाकरेंनी यावेळी दिला आहे.

“जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्यावरच काम केलं पाहिजे. हे प्रशासकीय काम नव्हे. गोष्टी योग्य पद्धतीने होत आहेत की नाही हे त्यांनी पाहावं. याच्यावर निर्णय घेण्याचं काम वैद्यकीय सल्लागारच करु शकतात,” असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

महाराष्ट्राला डावललं जात आहे का?
केंद्राला महाराष्ट्र नेहमीच आव्हान वाटत राहिलेला असून आजही डावललं जात आहे का? असं विचारलं असता राज ठाकरेंनी सांगितलं की, “आधीच्या महाराष्ट्रासोबत तसं वागणं समजू शकतो, कारण महाराष्ट्र तसा होता. आजचं एकूण पाहता केंद्राने तसं वागण्याची गरजच नाही”.

पुढे ते म्हणाले की, “ही वेळ केंद्र आणि राज्याने हातात हात घालून लोकांसाठी काम करण्याची असून वाद घालण्याची नाही. राजकीय तर नाहीच नाही…गेल्या काही महिन्यात मी मोदींना, मुख्यमंत्र्यांना लिहिलेली पत्रं, मुख्यमंत्र्यांशी केलेली चर्चा राज्याच्या हिताची होती आणि तेच मी सांगण्याचा प्रयत्न केला. मी कुठेही विरोधी पक्षात आहे हे सांगण्यासाठी गेलो नव्हतो किंवा तशी भूमिकाही निभावली नाही. आज लोकांना संकटातून बाहेर काढणं गरजेचं असून बाकीचं राजकारण गेलं तेल लावत”.

करोना संकट हाताळण्यावरुन टीका –
“हे जे काही जगावर संकट आलं त्याची कोणालाच कल्पना नव्हती. फक्त आपणच चुकीच्या अंगाने हाताळलं असं नाही, अमेरिका आणि युरोपमधील देशांकडूनही चुका झाल्या. फक्त ते लवकर वठणीवर आले पण आपण अजूनही आलो नाही. मागच्यास ठेच पुढचा शहाणा तसं आपल्याकडे झालं नाही. इंडियन मेडिकल काऊन्सिलने दुसरी लाट येणार सांगितलं असताना आपला देश अलर्ट राहिला नाही. आपले राजकारणी, सत्ताधारी अलर्ट राहिले नाहीत. त्यामुळे २०२० पेक्षा २०२१ भयानक आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” अशी खंत राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

“याप्रकारे आपल्या देशाची नाचक्की व्हावी यासारखं दुर्दैव नाही. आपण दुसरीकडून धडा नाही घेतला. आम्ही निवडणुका, कुंभमेळा, राजकारणात गुंतलो,” अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.

“केंद्र आणि राज्य या सगळ्या गोष्टी सुरु होत्या. केंद्र किंवा राज्य असेल…तुमचं घोडं राजकीय पक्षाने मारलं असेल, समाजाने तर मारलं नाही ना. मग अशा परिस्थितीत हे राज्य आपलं नाही ते आपलं असं करुन चालणार नाही. सगळा समाजच आपला आहे,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. “या दिवसात लोकांना ४०, ५० हजाराला इंजेक्शन घ्यावं लागत आहे. रुग्णालयाचं बिल लाखात गेलं आहे. अशी परिस्थिती आजपर्यंत भारतात आजपर्यंत झाली नव्हती,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 5:43 pm

Web Title: mns president raj thackeray loksatta drusthi ani kon cyclone tauktae pm narendra modi gujatat visit sgy 87
Next Stories
1 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फडणवीसांनी करून दिली २०१९ मधील त्यांच्याच मागण्यांची आठवण, म्हणाले…
2 आता बांगलादेशही आपल्याला सीमा बंद केल्याचं सांगतो; राज ठाकरे केंद्रावर संतापले
3 “मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा”, आशिष शेलारांची मागणी
Just Now!
X