महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाअधिवेशन आज पार पडत असून यावेळी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांची नेतेपदी निवड करत असल्याची घोषणा केली. यावेळी अमित ठाकरे यांनी वडील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मला आज ठराव मांडला जाणार असल्याची माहिती दिल्याने पायाखालची जमीन सरकली होती असं यावेळी त्यांनी सांगितलं. याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला आहे तो यापुढेही द्याल अशी अपेक्षा यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.

अमित ठाकरे यांनी लॉन्चिंग झाल्यानंतर बोलताना सांगितलं की, “राज ठाकरे यांचे मला आभार मानायचे आहेत. मनसेचा ठराव मांडणार हे काल संध्याकाळी मला त्यांनी सांगितलं. पायाखालची जमीन सरकणं काय असतं याचा अनुभव मला आला. पक्षाचं १४ वर्षातील हे पहिलं अधिवेशन असून २७ वर्षात पहिल्यांदा स्टेजवर बोलत आहे. याआधी जे प्रेम, प्रतिसाद दिला आहे तो यापुढेही द्याल अशी अपेक्षा आहे,” असं अमित ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा – अखेर मनसेचा झेंडा बदलला, राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण

अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर शिक्षणाचा ठराव मांडला. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. नेतेपदी निवड होताच अमित ठाकरे यांनी राज ठाकरेंसह कुटुंबीयांची भेट घेतली. शर्मिला ठाकरे यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देताना, अमित ठाकरेंचं लॉन्चिंग होताच अंगावर काटा आल्याचं सांगितलं, तसंच राज ठाकरेंच्या मातोश्री यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.