मनसे कार्यकर्त्यांकडून आज राज्यभरात वाढीव वीज बिलावरुन आंदोलन केलं जात आहे. मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये शेकडो कार्यकर्ते वीज बिल माफ करण्याची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात येत आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला वीज बिल भरु नका असं आवाहन केलं आहे. मनसे नेत्यांनी एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिली आहे.

मुंबईत होणाऱ्या आंदोलनात राज ठाकरे सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ते सहभागी झाले नाहीत. पण यावेळी त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला वीज बिल भरु नका असं आवाहन केलं आहे. जर वीज पुरवठा बंद करण्यासाठी कोणी आलं तर महाराष्ट्र सैनिकांसोबत संघर्ष होईल असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. यासंबंधीचं निवेदन मनसे नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे.

राज ठाकरेंनी निवेदनात काय म्हटलं आहे –
“या सरकारनं वीज देयकातून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट सुरु केली. हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा शॉक देणार असेल तर मग आम्हाला जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला काही झालं तरी वाढीव वीज देयकं भरु नका असं आवाहन केलं आहे. असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारला जनतेतील असंतोष जाणवणार नाही. सरकारच्या तुमच्या वीजेची जोडणी तोडू शकत नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर संघर्ष माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा”, असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

राज्यभरात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंनी दिला सक्त आदेश

“जनतेच्या तीव्र भावना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या आहेत. राज ठाकरेंनी एक पत्र त्यांना दिलं आहे ते आम्ही त्यांच्याकडे सोपवलं आहे. आमच्या आणि जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्या जनतेपर्यंत पोहचवा असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. यापुढे वीज बिल भरलं नाही किंवा काही कारवाई झाली नाही आणि कर्मचारी वीज कापायला आले तर त्यांच्या कानाखाली कोणी इलेक्ट्रिकचा शॉक काढला तर त्याची जबाबदारी मनसे नाही तर महाराष्ट्र सरकारचा राहील,” असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक, राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकले मोर्चे

दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना राज ठाकरेंनी सक्त आदेश दिल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मुंबईत वांद्रे येथे बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर गार्डनपर्यंत मोर्चा काढल्यानंतर मनसे नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. दरम्यान यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, “कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करायचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायचं आहे. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा राज ठाकरेंचा सक्त आदेश आहे. कुठेही गोंधळ गडबड करायची नाही, तोडफोड करायची नाही”.