News Flash

माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल; राज यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसाठी लिहिलं पत्र... काय म्हणाले राज ठाकरे वाचा संपूर्ण पत्र ....

राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांसाठी एक पत्र लिहिलं आहे.

देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी त्याचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस असून, अशा वाढदिवस साजरा करणं माझ्या मनाला पटत नाही, अशी भावना राज यांनी व्यक्त केली आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना एक पत्र लिहिलं आहे. राज्यातील करोना परिस्थिती जाणीव करून देत राज यांनी कुणीही भेटायला येऊ नये, घरीच राहून काळजी घ्यावी, असं कळकळीचं आवाहन केलं आहे.

राज ठाकरे काय म्हणाले? पत्र जसंच्या तसं…

दरवर्षी माझ्या वाढदिवसाला आपण भेटतो. तुम्ही फार प्रेमाने अनेक ठिकाणाहून येता. मलाही तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, उर्जा मिळते. तशी उर्जा जाहीर सभेतही मिळते. पण तिथे तुम्ही नुसते दिसता, भेटत नाही. म्हणून माझ्या दृष्टीने वाढदिवसाचा दिवस तुमच्या सहवासात, तुम्हाला भेटल्याने खरा साजरा होतो. तुमच्या भेटीची मी वाट पाहात असतो. मात्र हेही वर्ष बिकट आहे. मागच्या वर्षीसारखंच. अजूनही करोनाने महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. लॉकडाउन उठतो आहे. हळूहळू सगळं पूर्वपदावर यायला लागलं आहे. परंतु परिस्थिती अजूनही गंभीरच आहे. आजचंच पाहा, महाराष्ट्रात एका दिवसात काल १२,२०७ नवे रुग्ण सापडले आणि १,६४,७४३ जण आताही उपचार घेत आहेत. अशा वातावरणात वाढदिवस वगैरे साजरा करणे मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल.

हेही वाचा- माझं तोंड आणि सहकाऱ्यांचे हात याच कॉम्बिनेशनवर सगळा पक्ष – राज ठाकरे

हे वातावरणच असं आहे की आपण सावध असलं पाहिजे. खबरदारी घेतली पाहिजे. प्रवास करणं, मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, गाठी भेटी अशा गोष्टी करणं अजूनही टाळल्या पाहिजेत. म्हणून मी तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा, जिथे आहात, तिथे सुरक्षित राहा. आपल्या कुटुंबियांची, आसपासच्या परिसरातल्या लोकांची काळजी घ्या. तुम्ही प्रेमाने याल आणि आपली भेट होणार नाही असं नको व्हायला. तुम्ही सर्वांनी या करोना काळात जागरुकपणे चांगलं काम केलंत, ज्याचा मला फार अभिमान आहे. अशाच कामात राहा, अजूनही आपली माणसं दु:खात आहेत. कुणाची घरची माणसं गेली, त्यात आपल्या पक्षातलेही कितीतरी जण दुर्दैवाने आपल्याला सोडून गेलं. तसंच कुणाचे रोजगार गेले, त्या सर्वांना धीर द्या, त्यांच्यासाठी आता करता आहात तसंच काम करत राहा. आजवर राखलंत तसंच परिस्थितीचं भान राखा.

हेही वाचा- आपण अजूनही वठणीवर आलेलो नाही, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

थोड्याच दिवसात मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणाविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहेच. तोपर्यंत जिथे आहात तिथेच पूर्ण काळजी घेऊन कामात रहा. महाराष्ट्राला आता आपल्या कामातून एक दिलासा देण्याची आणि आश्वस्त करण्याची गरज आहे. म्हणून समाजोपयोगी कामात रहा. त्याच मला माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून मी आनंदानं स्विकारीन.

लवकरच भेटू.

आपला नम्र,

राज ठाकरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 12:28 pm

Web Title: mns raj thackeray birthday raj thackeray appeal raj thackeray tweet bmh 90
Next Stories
1 मोठी बातमी: आषाढी वारीसंदर्भात अजित पवारांनी जाहीर केला निर्णय
2 शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा?
3 राहुल गांधींना टीम तयार करावीच लागेल; शिवसेनेचा काँग्रेसला सल्ला
Just Now!
X