13 August 2020

News Flash

आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो, राज ठाकरेंची खंत

पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा महामोर्चा काढण्यात आला

आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा महामोर्चा काढण्यात आला. मोर्चा आझाद मैदानात पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर रोखठोक मत व्यक्त केलं. आपण फक्त दंगल झाली की हिंदू होतो, एरव्ही आम्हाला काही कळत नाही असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

“रझा अकादमीच्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यावेळी मला एकाने पासपोर्ट आणून दिला होता, जो बांगलादेशचा होता. त्यात येण्याची एंट्री होती पण जायचं काय. फक्त बांगलादेशातून दोन कोटी लोक आले आहेत. इतर ठिकाणाहून किती घुसखोर आले याची काहीच माहिती नाही. आम्ही फक्त दंगल झाली की हिंदू असतो. एरव्ही आम्हाला काही फरक पडत नाही,” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठी मुस्लीम राहतात तिथे दंगली नाही –
“जेथे मराठी मुस्लीम राहत तिथे कधी दंगली झालेल्या नाहीत. पण आज असे अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत जिथे पाकिस्तान, बांगलादेशमधील मुस्लीम राहत आहेत. मीरा भाईंदरमध्ये तर नायजेरियन लोक येत आहेत. पोलीस तिथे जाऊ शकत नाहीत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. ते ड्रग्ज विकतात, महिलांची छेड काढतात आणि आपण फक्त षंडासारखं पाहत राहायचं,” असा संताप राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चांचा अर्थच लागला नाही
मुस्लिमांनी जे मोर्च काढले त्याचा अर्थच कधी लागला नाही. सीएए किंवा एनआरसी असेल जे जन्मापासून येथे राहत आहेत त्यांना कोण बाहेर काढत होतं. तसं कायद्यातच नाही तर मग तुम्ही कोणाला ताकद दाखवलीत असा सवाल राज ठाकरे यांनी मोर्चा काढणाऱ्यांना यावेळी विचारला.

पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे. त्यात तडजोड होऊच शकत नाही. अनेकांना सीएएबद्दल काहीच माहिती नाही. फक्त व्हॉट्सअॅपवर चर्चा करतात आणि मेसेज पुढे पाठवतात. हा १९५५ सालचा कायदा आहे. ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यानंतर १९५५ साली हा कायदा झाला. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आज २००० मधील परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान भारतापासून विभक्त झाला होता, चाचपडत होता. पण आज काय परिस्थिती आहे त्या देशांची आणि खासकरुन पाकिस्तानची अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली.

राज ठाकरेंनी यावेळी घुसखोरांचं संकट गंभीर प्रश्न असल्याचं म्हटलं. “माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे,” असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का ?
राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)वरुन टीका करताना राज ठाकरे यांनी देश म्हणजे काय धर्मशाला वाटला का ? असा सवाल विचारला. कोणीही येतं, कसंही राहतं. आपल्या देशात अनेक प्रश्न आहेत याची मला कल्पना आहे. पण बाहेरुन येणाऱ्या घुसखोरांचाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताने काही माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. बाहेरच्या देशांमध्ये इतके कडक नियम आहे. पासपोर्ट नसल्यास पोलीस दोन पर्याय देतात…एक तर तुझ्या देशात परत जा किंवा जेलमध्ये जा. बाकीचे देश सुतासारखे सरळ होत आहेत. पण मग आम्हीच फक्त माणुसकीचा ठेका घेऊन बसलो आहोत का ? अशी विचारणा यावेळी राज ठाकरेंनी केली.

केंद्राच्या योग्य निर्णयांची स्तुती केली –
केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली तर भाजपाविरोधी आणि स्तुती केली तर भाजपाच्या बाजूने म्हटलं आहे. याच्या मधे काही आहे की नाही. जेव्हा चुकीचे निर्णय झाले तेव्हा त्यावर टीका केली. पण जेव्हा ३७० कलम काढलं तेव्हा अभिनंदन केलं. न्यायालयाकडून राम मंदिराला परवानगी देण्यात आली तेव्हा बाळासाहेब असते तर आनंद झाला असता असं म्हटलं होतं. राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना कऱण्याचं ठरलं तेव्हाही अभिनंदन केलं. त्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती लाभेल. आपण फुकट नाही मेलो असं त्यांना वाटेल असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा –
पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झालं आहे. अमेरिकेत दहशतवादी हल्ला करणारा ओसामा बिन लादेन पाकिस्तानात होता. आपल्या देशात अनेक बॉम्बस्फोट झाले ज्यात अनेक लोक मारले गेले या सगळ्यामागे पाकिस्तान होतं. दाऊद इब्राहिमलाही पाकिस्तानने सांभाळलं असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 5:56 pm

Web Title: mns raj thackeray mahamorcha caa nrc azad maidan riots hindu sgy 87
Next Stories
1 राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
2 यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देणार – राज ठाकरे
3 खेडय़ातला म्हणून हिणवल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या
Just Now!
X