महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये शिवजंयती साजरी केली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंती तिथीनुसार का साजरी करावी याचं कारण सांगितलं. आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. त्यामुळे महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी झाली पाहिजे असं राज ठाकरेंनी सांगितलं.

यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं. महाराजांची जयंती एक सण तो त्याप्रमाणेच साजरा झाला पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

“मी काही वर्षांपूर्वी जयंत साळगावकर यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी तेव्हा शिवजयंती तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार असं विचारलं होतं. यावर त्यांनी सांगितलं की, ३६५ दिवस करायची. पण तिथीनुसार का याबद्दल सांगायचं झालं तर, आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. त्यामुळे महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी झाली पाहिजे. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

आणखी वाचा- महाराष्ट्रात ३६५ दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे – राज ठाकरे

पुढे बोलताना राज ठाकरेंनी हा उत्सव दिमाखात साजरा कराल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली. तसंच शोभायात्राही उत्साहात पार पडेल अशी आशा असल्याचं म्हणाले. शिवजयंती साजरी होत असताना गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.

आणखी वाचा- करोनाचा उगाच बाऊ का केला जात आहे?; राज यांचा ठाकरे सरकारला सवाल

करोनासंबंधी बोलताना राज ठाकरेंनी आधीच या देशात रोगराई आहे त्यात अजून एक वाढला तर काय फरक पडतो असं म्हटलं. “काळजी घेतली पाहिजे यात काही वाद नाही. महाराष्ट्रात कोणाला लागण होता कामा नये,” अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली.