महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) आज महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचा महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज्यभरातू मनसैनिक मुंबईत दाखल झाले होते. मोर्चादरम्यानचा राज ठाकरेंचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या फोटोत राज ठाकरे दोन मुस्लिम व्यक्तींसोबत उभे असल्याचं दिसत आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. भारत फक्त आपला देश आहे. बांग्लादेशी, पाकिस्तानी आणि नायजेरियन घुसखोरांचा नाही असं यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसंच हा फोटो मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरुन रिट्विट करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. अशी कॅप्शन लिहिली आहे.

राज ठाकरे यांनी यावेळी देशावर प्रेम करणाऱ्या तसंच मराठी मुस्लिमांनाही जागरुक राहण्याचं आवाहन करत घुसखोरी करणाऱ्यांची तसंच षडयंत्र रचणाऱ्यांची माहिती पुढे येऊन दिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. सीएएविरोधात मोर्चा काढणाऱ्यांना मुस्लिम नागरिकांना सुनावताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, “तुम्हाला जे स्वातंत्र्य दिलं आहे ते जगात इतर कुठल्याही देशात दिलं जात नाही. एकोप्याने राहा. ज्या देशाने सगळं काही दिलं तो बर्बाद करण्याच्या मागे का लागला आहात”.

मुस्लिमांनी काढलेल्या मोर्चांचा अर्थच लागला नाही
“मुस्लिमांनी जे मोर्च काढले त्याचा अर्थच कधी लागला नाही. सीएए किंवा एनआरसी असेल जे जन्मापासून येथे राहत आहेत त्यांना कोण बाहेर काढत होतं. तसं कायद्यातच नाही तर मग तुम्ही कोणाला ताकद दाखवलीत,” असा सवाल राज ठाकरे यांनी मोर्चा काढणाऱ्यांना यावेळी विचारला.

मराठी मुस्लीम राहतात तिथे दंगली नाही –
“जेथे मराठी मुस्लीम राहत तिथे कधी दंगली झालेल्या नाहीत. पण आज असे अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत जिथे पाकिस्तान, बांगलादेशमधील मुस्लीम राहत आहेत. मीरा भाईंदरमध्ये तर नायजेरियन लोक येत आहेत. पोलीस तिथे जाऊ शकत नाहीत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. ते ड्रग्ज विकतात, महिलांची छेड काढतात आणि आपण फक्त षंडासारखं पाहत राहायचं,” असा संताप राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.