News Flash

कमालीचे प्रांजळ व तटस्थ महात्मा गांधींना राज ठाकरेंचं अभिवादन

"भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं यातच गांधींना अडकवलं गेलं आहे"

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते असं सांगताना अपराध परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय अशी खंत व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे
आज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं यातच गांधींना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय.

त्यांच्यात अहंभाव नव्हता, ‘माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे,’ हे सांगण्याचा प्रांजळपणा होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही. उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिपेक्षातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं सुरु झालं आहे.

‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरुर बोला’ हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. करोनाच्या या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील. महात्मा गांधीच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 11:23 am

Web Title: mns raj thackeray post on mahatma gandhi birth anniversary sgy 87
Next Stories
1 “सत्याचा धडा देणाऱ्या…”; गांधी जयंतीनिमित्त मनसेने उद्धव ठाकरेंना करुन दिली ‘त्या’ आश्वासनाची आठवण
2 तीन मुलांसह पती-पत्नीची नदीपात्रात आत्महत्या; कारण ऐकून गाव हादरले
3 करोना संकटात ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा करणार का? शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका
Just Now!
X