24 January 2021

News Flash

मराठमोळे श्रीकांत दातार ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’चे डीन नियुक्त झाल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले…

राज ठाकरेंनी व्यक्त केला अभिमान

भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची अमेरिकेच्या प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी नियुक्ती झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिमान व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हार्वर्डसारख्या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख एक मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची दुसरी बाब काय असणार असं ते म्हणाले आहेत. श्रीकांत दातार १ जानेवारी रोजी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या डीन पदाचा पदभार स्वीकारतील.

राज ठाकरेंची पोस्ट –
जगातील हार्वर्ड बिझनेस स्कूल’च्या डीन पदी श्री श्रीकांत दातार या मराठी माणसाची निवड झाली आहे ही माझ्यासाठी आणि तमाम मराठी जनांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. १९०८ साली बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे स्थापन झालेली ही संस्था जगातील पहिल्या पाच नामांकित संस्थांपैकी एक आहे. आज मराठी असंख्य तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार.

श्री श्रीकांत दातार यांच्याविषयी वाचताना त्यांचा प्रवास थक्क करुन गेला. चार्टर्ड अकाऊंटंट -आयआयएमएमधून व्यवस्थापनाचं शिक्षण – स्टेनफोर्ड विद्यापीठातून पीएचडी-कार्नेजी मेलन येथे अध्यापन – पुढे स्टॅनफोर्ड येथे अध्यापन आणि आता हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन.

या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या प्रथितयश विद्यार्थ्यांची नावं वाचताना महाराष्ट्रातील राहुल बजाज आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त फारशी नावं आढळली नाहीत. भविष्यात इथून उत्तीर्ण होऊन जगात मराठीचा झेंडा फडकवणारी अनेक नावं निघू देत ही मनापासून इच्छा.

जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभं आहे. आज आपले अनेक मराठी तरुण-तरुणी कृत्रीम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स, जेनेटिक्समध्ये काम करत आहेत. अशा सगळ्या तरुण-तरुणींना श्रीकांत दातार यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा आणि चौथ्या औद्योगिक क्रांतीत मराठी उद्योग सत्ता निर्माण व्हावी हीच इच्छा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे श्री श्रीकांत दातार यांचं मनापासून अभिनंदन. मराठी पाऊल असंच दिमाखात पुढे पडत राहो हीच इच्छा.

आणखी वाचा- मराठमोळे श्रीकांत दातार हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन

श्रीकांत दातार यांनी मुंबई विद्यापीठातून आपलं सुरूवातीचं शिक्षण पूर्ण केलं. १९७३ मध्ये ते उत्तीर्ण झाले. चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा घेतला. त्यानंतर दातार यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून सांख्यिकी आणि अर्थशास्त्र विषयात पीएचडी केली. दातार १९८४ ते १९८९ पर्यंत कार्नेगी मेलॉन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते १९९६ पर्यंत स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या बिझिनेस स्कूलमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. दातार हे आयआयएम कोलकाताच्या गव्हनिंग बॉडीचाही एक भाग आहेत. दातार हे हार्वर्ड बिझनेस स्कूलचे ११ डीन असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 2:22 pm

Web Title: mns raj thackeray post over indian origin academician shrikant datar named dean of harvard business school sgy 87
Next Stories
1 ‘..तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही’ रोहित पवारांचं पडळकरांना उत्तर
2 “वडेट्टीवार म्हणाले तुम्ही ओबीसीमध्ये का येत नाही?”; छत्रपती संभाजीराजेंचा गौप्यस्फोट
3 सौर पॅनल निर्मिती करणाऱ्या एकमेव महिला सोसायटीस मिळाले शासकीय पाठबळ
Just Now!
X