महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महाअधिवेशनकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी काय घोषणा करतात तसंच कोणती भूमिका घेतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा अमित ठाकरे यांच्याबद्दल काय घोषणा होणार याकडेही आहेत. अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबद्दल बोलताना, अमित ठाकरे यांच्यावर राजकीय जबाबदारी दिली जावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आम्ही तशी इच्छा व्यक्त केली आहे. पण अंतिम निर्णय राज ठाकरे यांचा असेल असं स्पष्ट केलं आहे.

महाअधिवेशनसाठी कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या ओळखपत्रांवर भगवा रंग असल्याने मनसे हिंदुत्त्वाचा मार्ग स्वीकारणार असल्याची पुन्हा चर्चा आहे. याबद्दल विचारलं असता संदीप देशपांडे यांनी सांगितलं की, “भगवा रंग कोणाची मालकी नाही. आतापर्यंत मनसेने नेहमी महाराष्ट्र धर्माचं पालन केलं असून यापुढेही करत राहू. हिंदुत्त्वाची प्रत्येकाची वेगळी व्याख्या आहे. ती नेमकी काय आहे हे स्पष्ट केलं पाहिजे. अयोध्येत राम मंदिर बांधू असं म्हटलं म्हणजे हिंदुत्त्व आहे का ?,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला. धर्म हा जबाबदारी म्हणून घेतली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा – आज मनसे अधिवेशनात काय होणार? जाणून घ्या ५ मुद्दे

पक्षात अनेक बदल करण्यात येण्यासंबंधी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थापनेवेळी भाषण करताना सतत बदल हे सकारात्मक लक्षण असल्याचं सांगितलं होतं. राजकीय पक्ष चालवत असताना समाजात होणारे बदल आपणही करणं गरजेचं आहे. पक्ष म्हणून पुढचा विचार करणं गरजेचं असतं. पुढील १० ते १५ वर्षांमध्ये पक्षाची काय वाटचाल असणार आहे याचाही विचार करावा लागतो”.

आणखी वाचा – मनसेच्या नव्या भूमिकेसाठी आशीर्वाद देणाऱ्या ‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाची सर्वत्र चर्चा

“महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आम्हाला व्हायचं असून त्यासाठी राज ठाकरे जे सांगतील ते आम्ही करण्यास तयार आहोत,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.