सोशल मीडियावर प्रियंका गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपा समर्थकांकडून आक्षेपार्ह टीका केली जात असताना या टीकेला मनसेने विरोध दर्शवला आहे. ‘अशा प्रकारची टीका अशोभनीय असून आपण महिलांचा सन्मान करायला कधी शिकणार?’, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी विचारला आहे.  राजकारण म्हटलं की एकमेकांवर टीका करणं आलंच. पण याच राजकारणात जेव्हा महिला नेतृत्वाचा विषय येतो, तेव्हा त्यांच्यावर ‘कमरेखालचे वार’ किती सहजपणे केले जातात, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्रियंका गांधी यांची काँग्रेस महासचिवपदी नेमणूक झाल्यानंतर आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर सोशल मीडियावरील भाजप कार्यकर्त्याकडून या दोन्ही महिला नेत्यांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका करण्यात आली होती. यानंतर शालिनी ठाकरे या दोन्ही महिला नेत्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत.

‘राजकारण-निवडणुका-शासकीय सेवा यामध्ये आज महिलांसाठी आरक्षण आहे. पण तरीही जेव्हा एखादी प्रियांका गांधी सारखी तरुणी राजकारणात उतरते तेव्हा तिची मापं काढली जातात, आणि ममता बॅनर्जींसारख्या बलाढ्य नेत्यावरही त्या केवळ महिला आहेत, म्हणून लग्नावरून थिल्लर विनोद केले जातात. हिंदू संस्कृतीच्या नावाने सदैव आरडाओरडा करणारे भाजपचे भक्त महिलांचा अपमान करण्यात पुढाकार घेतात. या अपमानाचा बदला या देशातील सर्व महिला मतपेटीतून घेतील, तेव्हाच मोदी-शहा यांचे डोळे उघडतील’, या शब्दात मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी भाजपा समर्थकांवर टीका केली.

राजकारणाच्या पलीकडे जाऊन , एक आधूनिक समाज म्हणून या देशातील निम्म्या लोकसंख्येचा म्हणजे महिलांचा आदर करायला आपण सर्वजण कधी शिकणार आहोत? असा सवालही शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.