राज्यातील विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली नसल्याचे नेतेमंडळी सांगत असली तरी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांमध्ये असलेल्या ८ जागांपैकी फक्त २ ठिकाणी मनसेने उमेदवार उभे केले असल्याने सेना-मनसेची अघोषित हातमिळवणी असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात विधानसभेच्या पाच जागा असून त्यापैकी फक्त दापोली मतदारसंघात मनसेचे विभागीय संघटक वैभव खेडेकर निवडणूक लढवत आहेत. मागील निवडणुकीत चिपळूण आणि रत्नागिरी याही मतदारसंघांमध्ये मनसेचे उमेदवार होते आणि त्यांनी अनुक्रमे सुमारे दहा व पाच हजार मते घेतली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तीन जागांपैकी फक्त सावंतवाडी मतदारसंघातून मनसेतर्फे माजी आमदार परशुराम उपरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेने उमेदवार उभे न केलेल्या मतदारसंघांमध्ये माजी मंत्री नारायण राणे यांच्या कुडाळ आणि त्यांचे चिरंजीव नितेश यांच्या कणकवली या जागांचा समावेश आहे.   रायगड जिल्ह्य़ातील सात जागांपकी पाच ठिकाणी मनसेने उमेदवार उभे केले असले तरी त्यांचा जाणवण्याइतका प्रभाव नाही.