लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय सारीपटावर आपल्या खेळीने सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना लक्ष ठेवायला लावणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता विदर्भातही राजकीय पाळेमुळे घट्ट केली असून विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपले. मनसेने आपल्या राजकीय खेळीने अल्पावधीतच शतकी इतिहास असलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या तोंडचे पाणी पळवून दखल घ्यायला लावली. लोकसभा निवडणुकीत विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात त्याचे प्रत्यंतर आले. मनसेची राजकीय खेळी दमदार होती का, याचे उत्तर चार दिवसाने होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर मनसेने आता आपले लक्ष विदर्भावर केंद्रित केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांपैकी जास्तीत जास्त जागा मनसे लढविणार आहे.
गेल्या निवडणुकीत मनसेने विदर्भात अगदीच काही जागा लढविल्या होत्या. त्यात अपेक्षेनुसार यश आले नसले तरी अनेक ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली होती. बहुतांश ठिकाणी मनसे उमेदवाराला मिळालेली मते दुसरा उमेदवार निवडून येण्यास वा पराभूत होण्यास कारणीभूत ठरली होती. या पाश्र्वभूमीवर मनसेने काम सुरू केले आहे.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्य़ाचा तीन दिवसांचा दौरा नुकताच पूर्ण केला. ४४.६ तापमान असतानाही अतिदुर्गम व मूळ बल्लारशा मतदारसंघातील पोंभुर्णा या जंगलाने वेढलेल्या तालुक्यापासून त्यांनी संपर्क दौरा सुरू केला. तेथील समाज भवनात झालेल्या मेळाव्यात विविध पक्षातील अनेक तरुणांना मनसेत प्रवेश केला. बल्लारशा, चिमूर, नागभीड,  ब्रह्मपुरी, सिंदेवाही, कोरपना, जिवती, गोंडपिंपरी, चंद्रपूर, वरोरा व भद्रावती येथे आढावा बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत दमदारपणे उतरायचे आहेच, पण जनहितार्थ कामे करणे हे मनसेचे पहिले कर्तव्य आहे. राजकारण वा निवडणूक हे त्याचे माध्यम आहे.
जनहितार्थ कामे करून नागरिकांची मने जिंका, कामाचा वेग वाढवा, सर्वसामान्य जनतेशी संवाद वाढवा, त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा, शाखा विस्तार करा, आदी सूचना करून हेमंत गडकरी यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
विदर्भातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मने जणून घेऊन तसा अहवाल पक्षाचे पर्यवेक्षक आमदार प्रवीण दरेकर व पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपविला जाईल. किती जागा लढवायचा, आदी सर्व निर्णय राज ठाकरे जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले.