किनवट येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख सुनिल आनंदराव ईरावार (वय 27 वर्षे) यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनिल यांच्या आत्महत्येमुळे मनसेला धक्का बसला अनू कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक आवाहन करण्यात आलं आहे. ‘सर्वसामान्यांमधून नेता घडविणारा किमयागार आपल्याकडं आहे. थोडा संयम ठेवा,’ असं भावनिक आवाहन करणारे ट्वीट मनसेनं केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर राज ठाकरे यांच्या भाषणाची एक मिनिटांची क्लिप पोस्ट करण्यात आली आहे. त्यासोबत कार्यकर्त्यांसाठी खास मेसेजही शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सुनिल इरावार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. “सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांमधून नेता घडविणारा किमयागार आपल्याकडे आहे, फक्त थोडा संयम आणि विश्वास ठेवा कारण मार्ग खडतर असला तरी ठाम आहे. सुनील इरावर सारख्या उमद्या महाराष्ट्र सैनिकास गमावणं, हे हेलावून टाकणारं आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. #संघर्षयोद्धा #महाराष्ट्रसैनिक” असी पोस्ट व्हिडीओच्या वरती लिहिली आहे.

‘संघर्ष कधी संपत नसतो. तो सुरूच असतो. दिग्गजांच्या आयुष्यातही बॅडपॅच येत असतो. पण उतारानंतर पुन्हा चढ असतो. पण खचले नाहीत,’ असं राज ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करुन कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा- ‘राजसाहेब माफ करा..’ म्हणत मनसे पदाधिका-याची आत्महत्या

सुनिल आनंदराव ईरावार यांनी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. त्यांनी लिहिलं होतं, ‘पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आहे आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळं मी माझं जीवन माझ्या मनानं संपवत आहे. तरी माझ्यामुळं कोणालाच त्रास देऊ नका,’ अशी सुसाइड नोट लिहित मनसेचे सुनील ईरावर यांनी १५ ऑगस्ट रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती. हे टोकाचं पाऊल उचलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफीही मागितली होती.