News Flash

मनसेने व्हिडीओ ट्विट करत दिले बदलाचे संकेत, दाखवली ‘हिंदवी स्वराज्या’ची झलक

या व्हिडिओत राज ठाकरेंच्या भाषणातील एक वाक्यही आहे

(संग्रहित छायाचित्र)

विधानसभा निडवणुकीमध्ये शंभर जागा लढवूनही केवळ एकमेव आमदार निवडून आल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना कात टाकण्याच्या तयारीत आहे. २३ जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनामध्ये राज ठाकरेंच्या पक्षाने हिंदुत्वाची कास धरण्याची संपूर्ण तयारी झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या या चर्चेला समर्थन दर्शवणारे संकेत देणारे ट्विट मनसेच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे.

अवश्य वाचा – स्वराज्याच्या पर्वाची चाहूल ‘जिऊ’; लवकरच रुपेरी पडद्यावर

काय आहे चर्चा?

२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.

झेंडा बदलण्यावर शिक्कामोर्तब?

इतक्या दिवस सुरु असणाऱ्या मनसेच्या झेंडा बदलाच्या चर्चेवर २० जानेवारी रोजी जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. पक्ष चिन्हातून झेंडा काढण्यात आला आहे आणि फक्त रेल्वे इंजिनच ठेवण्यात आलं आहे. मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन पक्षचिन्हाच्या मागे असलेला झेंडा हटवण्यात आला आहे. त्या ठिकाणी आता फक्त रेल्वे इंजिनच दिसतं आहे. त्यामुळे निळा, भगवा आणि हिरवा असे तीन रंग असलेला मनसेचा झेंडा बदलणार हे निश्चित मानलं जातं आहे.

नव्या व्हिडिओत काय?

मनसेच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक १६ सेकंदांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आकृती दिसत आहे. तसेच या ट्विटमध्ये ‘हिंदवी स्वराज्य’ हा हॅशटॅगही वापरण्यात आला आहे. या व्हिडिओला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा व्हाइस ओव्हर आहे. राज यांच्या भाषणातील “महाराजांच्या आजपर्यंतच्या सगळ्या लढाया आपण पाहिल्या तर प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक जातीचा माणूस हिंदवी स्वराज्यासाठी लढत होता” ही ओळही व्हिडिओत ऐकू येते.

हिंदुत्वाचा मुद्दा का?

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी शिवसेनेप्रमाणेच मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. यामध्ये दुकानांवरील पाट्या मराठीत करण्याचे मनसेचे आंदोलन चांगलेच गाजले होते. मात्र त्यानंतर कोणत्याच निवडणुकांमध्ये मराठीचा मुद्दा तितकासा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे आता मराठीच्या ऐवजी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण करण्याचा मनसेचा विचार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेच्या मतदारांना या मुद्द्याच्या आधारावर आकर्षित करण्याचा मनसेचा विचार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 2:19 pm

Web Title: mns tweets video with maharashtra dharma hindavi swarajya hashtag scsg 91
Next Stories
1 पुस्तक झालं आता व्हिडीओ आला; मोदींच्या त्या व्हिडीओवर संभाजी राजेंची संतप्त प्रतिक्रिया
2 शिवसेनेनं भाजपाला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही; खडसेंनी टोचले स्वपक्षीय नेत्यांचे कान
3 अळूचं फदफदं हवं की मिरचीचा ठेचा? मनसे नेत्याने ट्विट करत दिले मोठ्या बदलाचे संकेत
Just Now!
X