नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ क साठी झालेल्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नव निर्माण सेना अर्थात मनसेने बाजी मारली आहे. मनसेच्या वैशाली भोसले यांचा प्रतिष्ठेच्या लढाईत विजय झाला. प्रभाग क्रमांक १३ क च्या पोटनिवडणुकीसाठी ६ एप्रिलला मतदान झाले होते. त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत मनसेने बाजी मारली आहे.

मनसेच्या नगरसेविका सुरेखा भोसले यांचे निधन झाले. त्यामुळे ही जागा रिकामी झाली होती. त्यासाठी ६ एप्रिल ला मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत शिवसेनेने स्नेहल चव्हाण आणि भाजपाने हर्षदा लोणारी यांना उमेदवारी दिली होती. तर मनसेने सुरेखा भोसले यांच्या घरातल्या सदस्य असलेल्या वैशाली भोसलेंना उमेदवारी दिली. या निवडणुकीत वैशाली भोसले यांचा विजय झाला.

या पोटनिवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला म्हणजेच वैशाली भोसले यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. मनसेच्या वैशाली भोसले यांना ७ हजार ४९० मते मिळाली. तर भाजपाच्या हर्षदा लोणारी यांना ४८१० मते मिळाली. शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांना ५२६६ मते मिळाली. वैशाली भोसले यांचा २२०० पेक्षा जास्त मतांनी विजय झाला.