ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटक आणि वन्यप्रेमींना आता मोबाइलमध्ये वाघाचे चित्रीकरण करता येणार नाही. ताडोबात आता १ डिसेंबरपासून मोबाइलवर बंदी टाकण्यात आली आहे. वन्य प्राण्यांना त्रास होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात अतिउत्साही पर्यटक, गाईड  व जिप्सी चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होते. या पार्श्वभूमीवर ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

वनविभागाचे निरीक्षण काय?
> सफारीच्या वेळी वाघ, बिबट्या किंवा अन्य प्राण्यांचे दर्शन झाल्यास पर्यटक, मार्गदर्शक व जिप्सी वाहनचालक हे इतर वाहनचालकांना मोबाइलवरुन सुचित करतात. अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी अन्य चालक गाडी वेगाने चालवतात. यामुळे चालक, पर्यटकांसह वन्य प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच एकाच जागी सर्व पर्यटक आल्यास प्राण्यांचा मार्गही अडवला जाऊ शकतो.
> काही पर्यटक हे वन्यप्राण्यांचे फोटो जिओ टॅगसह सोशल मीडियावर अपलोड करतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या ठिकाणाचा तपशील सर्वांना कळू शकतो. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने यापूर्वीच वन्यप्राण्यांचे छायाचित्र किंवा ठिकाणाचा तपशील सोशल मीडियावर टाकण्यास मज्जाव केला आहे.
> काही पर्यटक हे वाघांच्या जवळ सेल्फी काढतात. यामुळे अनुचित प्रकार घडू शकतात.

काय म्हटलंय निर्णयात?
१ डिसेंबर २०१८ पासून सर्व पर्यटक, जिप्सी वाहनचालक आणि मार्गदर्शक यांना सफारीच्या वेळी व्याघ्रप्रकल्पात मोबाइल नेण्यास बंदी असेल. याचे उल्लंघन करताना आढळल्यास किंवा तक्रार आल्यास पर्यटकाला तात्काळ बाहेर काढण्यात येईल तर मार्गदर्शक, जिप्सी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.