करोनाच्या संसर्गाबाबत लवकर निदान होण्यासाठी रत्नागिरी शहर आणि परिसरात बुधवारपासून दोन फिरती तपासणी पथके कार्यरत झाली असून दिवसभरात  ५० नागरिकांची अ‍ॅन्टीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोघांना या रोगाची लागण झाल्याचे आढळले आहे.

जिल्हा मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यत करोनाबाधितांचा आकडा पाच हजारावर पोचला आहे. आतापर्यंत सुमारे ६५ टक्के रूग्ण बरे झाले आहेत; मात्र मृत्यूदर तीन ते साडेतीन टक्कय़ापर्यंत आहे. तो नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. ‘लवकर निदान, लवकर उपचार’ हे तत्त्व अंगिकारून आरोग्य विभागामार्फत मोफत अ‍ॅन्टीजेन तपासणीसाठी दोन मोबाईल व्हॅन रत्नागिरी शहर आणि परिसरात बुधवारपासून तैनात केल्या आहेत. हे पथक गर्दी आणि ‘हॉटझोन’मध्ये अ‍ॅण्टीजेन चाचण्या करणार आहे. बुधवारी या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. करोनासदृश लक्षणे (उदा. ताप, सर्दी, घशाला खवखव, कोरडा खोकला, धाप लागणे, ओठ निळे पडणे, अशक्तपणा आदी) असणाऱ्यांचीही तपासणी या पथकांद्वारे केली जाणार आहे.

एरवी या चाचणीसाठी ५०४ रुपये खर्च येतो. परंतु शासनाकडून ही सुविधा पूर्णत: मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

त्यामुळे या रोगाचे वेळीच निदान करुन शंकानिरसन करण्यासाठी सोयी सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.