News Flash

४८ तास वीजपाण्याविना

तौक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

वसई, विरार शहरांसह पालघर जिल्ह्यत पावसामुळे दाणादाण; वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे मोबाइल, इंटरनेट, केबलही बंद

वसई: तौक्ते चक्रीवादळामुळे पालघर जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवारची रात्र  अंधारात काढावी लागली. अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटल्या आणि रोहित्रेदेखील वादळामुळे पडली.  महावितरणची विद्युत उपकेंद्रे खंडित झाली होती. शहरातील अनेक भागांतील नागरिकांना ४८ तासांपेक्षा अधिक वेळ विजपाण्याविना काढावी लागली. वीज नसल्याने मोबाइल, इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने एक प्रकारे तालुक्यातील नागरिकांचा इतरांशी संपर्क तुटला होता.

सोसाटय़ाचे वादळ आणि त्यापाठोपाठ आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्य़ात हाहाकार उडवला होता. अनेक ठिकाणी वीजवाहक तारांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पाण्यावरही परिणाम झाला.  अनेक ठिकाणी उच्च दाब आणि लघुदाब वाहिनी तसेच रोहित्र पडले होते. वादळी पावसामुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना कामे करण्यात अडचणी येत होत्या. रविवारी मध्यरात्रीपासूनच अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. सोमवार सकाळपासून तर सर्वच ठिकाणाचा वीजपुरवठा बंद झाला.     घरात असलेले इन्व्हर्टरदेखील बंद पडले. त्यामुळे मोबाइल फोन, लॅपटॉपदेखील चार्ज करता आले नाही. मोबाइल कंपन्यांच्या मनोऱ्यांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने   नेटवर्क कंपन्यांची सेवा बंद पडली. मोबाइल चार्ज नसल्याने बंद होते  ज्यांचे थोडेफार सुरू होते, ते नेटवर्क नसल्याने निरुपयोगी ठरले.  वायफाय सुविधादेखील बंद होत्या. टाळेबंदीमुळे   ‘वर्क फ्रॉम होम’  करणाऱ्यांचे  हाल झाले. विजेअभावी पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्यात संपर्काची साधनेच कोलमडल्याने नागरिक हवालदिल  होते. महावितरणच्या पालघर विभागातील ८० ते ९० टक्के भागांमध्ये वीज नसल्याने ग्रामीण जिल्ह्यत अंधाराचे साम्राज्य पसरले होते.

‘वीजवाहिन्या भूमिगत करा’

आम्ही मुंबईच्या जवळ राहतो. वादळ सगळीकडे असते तर केवळ दर वेळी वसई-विरारलाच फटका का बसतो, असा सवाल वसईतील मनाली मेहता या महिलेने केला आहे. महावितरणाचे खासगीकरण करा, भूमिगत वीजवाहक तारा टाका, अशा मागण्या समाजमाध्यमांवरून नागिरकांनी केल्या. चार वर्षांपूर्वी वसईत पूर आला होता. त्या वेळी अनेक दिवस वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्या वेळच्या कटू आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्या.

३८ पैकी २९ उपकेंद्रे कार्यरत

महावितरण विभागाचे अधिकारी- कर्मचारी कालपासून अहोरात्र काम करीत असून विद्युतपुरवठा पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात आहेत. जिल्ह्यतील ३८ उपकेंद्रांपैकी २९ उपकेंद्रे मंगळवार सकाळपर्यंत कार्यरत करण्यात आली होती. मात्र अनेक खांब टॉवर कोसळल्याने तसेच विद्युतवाहिनी झाडाच्या फांद्या व झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यास अडथळा येत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय सलग कोसळणाऱ्या पावसामुळे नवे खांब उभे करण्यास त्रासदायक ठरत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 3:31 am

Web Title: mobile internet cable also shut down due to power outage ssh 93
Next Stories
1 सूर्या, उसगाव धरणाचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे वसईकरांवर पाणी संकट
2 पालघर, डहाणू तालुक्यांना झोडपले
3 Cyclone Tauktae : चक्रीवादळातील बळींची संख्या १३
Just Now!
X