माढा लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ातील पुरेशा निधीअभावी रेंगाळलेल्या विविध सिंचन प्रकल्पांना चालना देण्यास प्राधान्य देण्याचे आश्वासन जलसंपदांत्री शशिकांत शिंदे यांनी दिले.
माढय़ाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी मुंबईत राज्य साखर संघाच्या कार्यालयात शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत माढा व सोलापूर परिसरातील विविध उपसा जलसिंचन योजना तथा पाणी प्रश्नावर बैठक आयोजित केली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना जलसंपदामंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांच्यासह आमदार प्रभाकर घार्गे, आमदार बबनराव शिंदे, आमदार श्यामल बागल, आमदार हणमंत डोळस, आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार सदाशिव पोळ, दिलीप येळेगावकर आदी उपस्थित होते. माण, खटाव उपसा सिंचन योजनेचा माण व खटाव भागाला लाभ होणार असून या माध्यमातून २७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला निधी उपलब्ध असूनसुध्दा केवळ सुधारित प्रशासकीय मान्यता नसल्यामुळे हे काम रखडल्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. सोलापूर जिल्ह्य़ातील कुर्डू, अंबा, पिंपळे खुर्द या भागाला पाणी मिळण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. उजनी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन न झाल्याने या  भागाला पाणी मिळत नाही. तेथील प्रकल्पाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, अशा सूचना जलसंपदामंत्री शिंदे यांनी प्रशासला दिल्या.
नीरा देवधर योजनेसाठी १ ऑगस्ट २०१४ पासून माळशिरस उपविभागीय कार्यालयामार्फत सर्वेक्षण सुरू करावे, अशी मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी केली. तसेच सांगोला तालुक्यातील कालव्यासाठी केंद्राच्या एआयबीपी या उपविभागाकडून निधी मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, जर हा निधी उपलब्ध न झाल्यास राज्य शासनाने निधी द्यावा, राजेवाडी तलावासाठी पाचुर्णी गावचे सर्वेक्षण करून राज्य शासनाकडून निधी मिळावा, अशीही मागणी त्यांनी केली. एआयबीपी योजनेतून दुष्काळी भागासाठी मदत देण्याबाबत राज्य शासनाने पाठपुरावा करावा तसेच जलसंपदा विभागाकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याचीही मागणी खासदार मोहिते-पाटील यांनी केली. माण तालुक्यातील १६ गावे आणि खटाव तालुक्यातील १४ गावे पाण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी येत्या १३ जुलै रोजी वडूज येथे बैठकीचे आयोजन केल्याचे त्यांनी नमूद केले.