News Flash

नदीकाठचे नुकसान टाळण्यासाठी ‘एककालिक आधार सामग्री संकलन’  

धरणांतून पाणी सोडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान

|| अनिकेत साठे

धरणांतून पाणी सोडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान

पुरामुळे नदीकाठालगतच्या परिसरात कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी राज्यातील धरणांमधून पाणी सोडण्याची पारंपरिक पद्धत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बदलण्याच्या मार्गावर आहे. कृष्णा-भीमा खोऱ्यात आधीपासून तिचा अवलंब केला जातो; परंतु पंचगंगेच्या उपखोऱ्यासह कोकण, तापी, गोदावरी (मराठवाडा आणि विदर्भ) या सर्व खोऱ्यांमध्ये स्वयंचलित पर्जन्यमापक, हवामान केंद्र, नदी-खोरे प्रवाहमापक आणि बाष्पीभवन अशा एकूण ५७७ यंत्रणा बसविण्यात येत आहेत.

या अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून प्रत्येक धरणप्रमुखास अद्ययावत माहिती मानवी हस्तक्षेपाशिवाय जलद गतीने उपलब्ध होईल. या माहितीचे पृथक्करण होऊन धरणात येणाऱ्या आणि नदीतून वाहणाऱ्या पाण्याविषयी माहिती मिळेल. त्याचबरोबर संभाव्य पूरस्थितीचा संगणकीय नकाशा उपलब्ध होईल. जेणेकरून खोरी- उपखोऱ्यांतील सर्व धरणांचा विचार करून एकात्मिक जलाशय परिचालन प्रणालीचा प्रभावीपणे अवलंब करता येईल.

यंदा पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांस महापुराचा तडाखा बसला. पावसाळ्यात धरणात जलसंचय अथवा विसर्ग करताना घेतले जाणारे निर्णय धरणप्रमुखाची परीक्षा पाहणारे असतात. त्यात काही गफलत झाल्यास धरणाखालील भाग पाण्याखाली जाऊ शकतो. विसर्ग न केल्यास धरणच धोक्यात येण्याची शक्यता असते. कात्रीत सापडलेल्या प्रमुखाला उपलब्ध माहितीच्या आधारे कोणता तरी एक निर्णय घ्यावा लागतो. पावसाळ्यात धरणात प्रत्येक महिन्यात किती जलसाठा करायचा, विसर्गासाठी दरवाजे कधी उघडायचे याचे वेळापत्रक असते. यामध्ये धरणप्रमुख आपल्या धरणाचा विचार करून निर्णय घेत असल्याने एकाच खोऱ्यातील विविध धरणांमधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा अंदाज करणे अवघड बनते. याचा फटका खोऱ्यातील पुढील भागास आणि धरणांना बसण्याची शक्यता वाढते. धरणाची जबाबदारी सांभाळणाऱ्यांना दरवर्षी तारेवरची कसरत करावी लागते.

ज्या आधारे हे निर्णय घेतले जातात, ती माहिती पारंपरिक आधारसामग्री केंद्रातून एका कर्मचाऱ्याने संकलित केलेली असते. मानवी सहकार्यावर हे कार्य चालते. यामुळे अद्ययावत माहिती किती वेळा मिळेल हे सांगणे अवघड असते. आधुनिक उपकरणांमुळे मानवी हस्तक्षेप पूर्णत: टळेल आणि आवश्यकतेनुसार अगदी १५ मिनिटे ते एक तासादरम्यानची अद्ययावत माहिती उपलब्ध होईल.

एकाच खोऱ्यातील अनेक धरणांमुळे दरवाजांची उघड-झाप (परिचालन) करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची झाल्याची बाब राज्य शासनाने नेमलेल्या तांत्रिक समितीने निदर्शनास आणली होती. पूरनियंत्रणासाठी जुनाट पद्धतीऐवजी एककालिक पूर पूर्वानुमानाची गरज मांडून समितीने खोरेनिहाय एकात्मिक जलाशय परिचालन प्रणालीची शिफारस केली. या अनुषंगाने स्थापलेल्या ‘खोरे समरूपण विभागा’ने कृष्णा-भीमा खोऱ्यांचा अभ्यास केला. नंतर या खोऱ्यात (पंचगंगा उपखोरे वगळून) २४९ आधुनिक उपकरणे बसविली गेली. त्याची उपयोगिता लक्षात आल्यामुळे राज्यातील पाचही खोऱ्यांमध्ये पाऊस, नदी-खोरेनिहाय पाणीपातळी आदी मापनासाठी स्वयंचलित यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यासाठी ५३ कोटींची गुंतवणूक केली जात आहे. यामुळे राज्याच्या सर्व खोऱ्यांमध्ये एककालिक आधार सामग्री संकलन पद्धती कार्यान्वित होईल, असे राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यशवंतराव भदाणे यांनी सांगितले. याआधारे निर्णय घेण्यासाठी साहाय्यकारी व्यवस्था उभी राहील. पूरनियंत्रण, सिंचन व्यवस्थापन, जलसाठय़ाचा सुयोग्य वापर यासाठी तिचा उपयोग होईल, असे भदाणे म्हणाले.

खोरेनिहाय उपकरणे

  • एकात्मिक जलाशय परिचालन प्रणालीसाठी राज्याच्या पाचही खोऱ्यांमध्ये एककालिक आधार सामग्री संकलन पद्धती कार्यान्वित करण्याचे काम सुरू
  • या पद्धतीने पर्जन्यमापन, नदी-खोऱ्यातील पाणीपातळी, हवामान, बाष्पीभवन आदी माहिती स्वयंचलित उपकरणांद्वारे संकलित करणार
  • ही माहिती उपग्रहाधारित व्यवस्थेतून प्रत्येक खोऱ्यातील, प्रत्येक धरणांच्या प्रमुखांना उपलब्ध करणार
  • तापी नदी-खोऱ्यात अशा स्वरूपाची १६४, गोदावरी नदी-खोरे (मराठवाडा) १५४, गोदावरी नदी-खोरे (विदर्भ) १४५, कृष्णा आणि भीमा नदी-खोरे (विस्तारित) ५१, कोकण नदी-खोऱ्यात ६३ अशी ५७७ उपकरणे बसवणार
  • या उपकरणांमध्ये २९६ पर्जन्यमापक, १७ हवामान केंद्रे, ६९ नदी प्रवाहमापक, १४० खोरे प्रवाहमापक, ५५ बाष्पीभवन पात्र यांचा समावेश

आधुनिक उपकरणांमुळे स्वयंचलित पद्धतीने तात्काळ माहिती उपलब्ध होते. तिचा उपयोग कृष्णा, भीमा खोऱ्यांतील धरणांमधून विसर्ग करताना झाला. यामुळे पूर नियंत्रित राखणे शक्य झाले. ही व्यवस्था नसती तर धरणांमधून अधिक विसर्ग करावा लागला असता. खोरे, उपखोरेनिहाय एकात्मिक जलाशय परिचालन प्रणालीची आधीपासून आवश्यकता होती. नव्या उपकरणांमुळे हे काम सोपे झाले. राज्यातील सर्व खोऱ्यांमध्ये तिचा अवलंब केला जाणार आहे. पाणी सोडण्याबाबत आता अधिक व्यापक विचार होत आहे. कृष्णा खोरे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. कृष्णा नदी महाराष्ट्रातून पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून समुद्राला मिळते. धरणांतून पाणी सोडण्याबाबत तीन राज्यांमध्ये आता एकात्मिक विचार होत आहे.        – राजेंद्र पवार, सचिव, जलसंपदा विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 11:46 pm

Web Title: modern technology for water resource management mpg 94
Next Stories
1 संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित
2 ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी ग्रामीण भागांतील महिलांचा पुढाकार
3 बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळेंना लाच घेताना अटक
Just Now!
X