‘टफ्स’ योजनेच्या शिल्पकाराचे वस्त्रोद्योगात स्मरण

दयानंद लिपारे, कोल्हापूर :

कालगतीत मागे पडलेल्या देशातील वस्त्रोद्योगाला आधुनिकीकरणाच्या वळणावर आणण्याचे अतुलनीय कार्य ‘टफ्स’ योजनेद्वारे झाले. या योजनेचे श्रेय देशाचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जाते. १९९९ साली ‘टफ्स’चा पाया त्यांनी घातल्याने आज देशातील वस्त्रोद्योग नवतंत्रज्ञानाचा साक्षी झाला असून, काही लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन दर्जेदार कापड निर्मितीचे जगातील प्रमुख केंद्र बनला आहे. विकेंद्रित क्षेत्रातील वस्त्रोद्योगाला तर ही योजना संजीवनी बनली. वाजपेयींच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागवताना देशातील वस्त्रोद्योगात त्यांच्या या कामगिरीचा उल्लेख सर्वत्र होत आहे.

कालौघात वस्त्रोद्योगाचे चक्र  मागे राहिले होते, त्याला अत्याधुनिकीकरणाचा आयाम देण्यासाठी वाजपेयी सरकारने ‘टफ्स’ योजना सुरू केली. या योजनेसाठी सुरुवातीला २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती.

वस्त्रोद्योगाला चांगले दिवस आणायचे असतील तर त्यामध्ये आधुनिकीकरण करणे गरजेचे होते. असे आधुनिकीकरण केले तर उत्पादनाचे प्रमाण आणि त्याच्या दर्जात आमुलाग्र बदल होणार होता. हेच ओळखून या क्षेत्राला मदत करण्याचे धोरण ‘टफ्स’ योजनेतून आखण्यात आले. या योजनेतून नवी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी सवलत देण्यात आली, कर्जावरील व्याजाला सवलत देण्यात आली.

राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण मसुदा समितीचे प्रमुख, भाजपचे प्रदेश सरचिटणीस, आमदार सुरेश हाळवणकर ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले, की वाजपेयींनी या योजनेद्वारे देशाच्या वस्त्रोद्योगाचा पूर्ण ढाचा बदलून टाकला. देशातील वस्त्रोद्योगात आधुनिकीकरणाचे वारे फिरू लागल्याने सूतनिर्मितीपासून ते कापडनिर्मितीपर्यंत मोठय़ा प्रमाणात सुधारणा झाली. दर्जेदार कापडाची निर्मिती झाली. ते कापड विदेशात पोहोचून देशाला परकीय चलन उपलब्ध होऊ  लागले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या क्षेत्रात भारताचे स्थान उंचावण्याचे काम करणारे वाजपेयी यांना वस्त्रोद्योग आधुनिकीकरणाचे शिल्पकार म्हणावे लागेल.

माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, की वाजपेयी यांनी वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणाचा घालून दिलेला पायंडा पुढे अनेक राज्यांनी आपल्या परीने अमलात आणला. त्यामध्ये महाराष्ट्र हे अग्रस्थानी राहिले. केंद्र शासनाची टफ्स योजना आणि मी मंत्री असताना राज्य शासनाने सादर केलेल्या २३ कलमी वस्त्रोद्योग योजनेमध्ये समाविष्ट केलेले व्याज अनुदान, प्रोत्साहनपर सवलत, वीज सवलत, डी प्लस योजनेचे लाभ, यामुळे महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योगाने कात टाकली. त्यामुळे राज्याच्या वस्त्रोद्योग प्रगतीचे प्रेरक म्हणून वाजपेयी यांचे सदैव स्मरण केले जाईल.

काय आहे ‘टफ्स’ योजना

देशात अत्याधुनिक तंत्रज्ञान यायचे असेल तर उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते. हे ओळखून ‘टफ्स’ योजनेला केंद्र शासनाकडून आकार देण्यात आला. त्यानुसार सुरु वातीला यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी २० टक्के अनुदान किंवा व्याजात ५ टक्के सवलत असे त्याचे स्वरूप ठरवण्यात आले होते. याला प्रतिसाद मिळताच पुढे खरेदीवरील हे अनुदान ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले. त्यामुळे लाखात गुंतवणूक करणारा उद्योजक कोटींमध्ये, तर कोटींमध्ये गुंतवणूक करणारा अब्जावधीमध्ये गुंतवणूक करण्याचे धाडस दाखवू लागला. यातून देशांतर्गत वस्त्रोद्यागाला मोठी चालना मिळाली.