News Flash

दक्षिणमुखी मारुतीमुळेच मोदी, शहांना यश

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता येण्यास ‘मोदी लाट’ कारणीभूत असली तरी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोदी यांच्या यशाचे वेगळेच रहस्य सांगितले आहे.

| November 17, 2014 02:30 am

केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता येण्यास ‘मोदी लाट’ कारणीभूत असली तरी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खरे यांनी मोदी यांच्या यशाचे वेगळेच रहस्य सांगितले आहे. खुलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीच्या आशीर्वादामुळेच मोदी यांना त्यांच्या पक्षातून अभय मिळाले आहे, असा अचाट गौप्यस्फोट खैरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मागे गोध्रा हत्याकांडानंतर लागलेला पोलिसांचा ससेमिराही याच दक्षिणमुखी मारुतीमुळे टळला आहे. शहा नेहमीच खुलताबादला यायचे आणि त्यांच्यासाठी अभिषेकाची व्यवस्थाही मी करायचो. शनिवारच्या अभिषेकालाही वैयक्तिक मदत मीच केली, असे वक्तव्यही त्यांनी केले.

मराठवाडय़ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांचा रविवारी दौरा होता. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेणार होते. मात्र नियोजित वेळेत ते पोहोचू न शकल्याने खैरे पत्रकारांना सामोरे गेले. पत्रकारांनी या वेळी शनिवारच्या अभिषेकाचा विषय सहज छेडला आणि खैरेंची गाडी सुटली. अभिषेकाचा खर्च शिवसेनेचा की भाजपचा, असे विचारण्यात आले, तेव्हा खैरेंनी मुक्ताफळे उधळली. अभिषेकासाठी बरेचे पैसे लागतात, असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

संघाची मध्यस्थी
नागपूर अधिवेशनात गोंधळ होईल म्हणून पुन्हा नव्याने संघाची मध्यस्थी सुरू आहे. हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ‘सध्या तरी’ आम्ही विरोधी पक्षात आहोत, असे खैरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  सध्या तरी या शब्दाचा अर्थ काय, असा प्रश्न विचारला असता संघ मध्यस्थी करत असल्याचे त्यांनी सांगितले. ही मध्यस्थी आपणास माध्यमातूनच कळल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खैरे उवाच!
top02‘‘गोध्रा हत्याकांडप्रकरणी अमित शहांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा होता. त्यामुळे ते दक्षिणमुखी मारुती मंदिरात यायचे. गोध्रा हत्याकांडानंतर नरेंद्र मोदी यांना भाजपमध्ये ठेवूच नये, अशी भूमिका काही जणांनी मांडली होती. तेव्हा ते अडचणीत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यासाठी शब्द टाकला. तत्पूर्वीदेखील कृष्णा महाराजांकरवी दक्षिणमुखी मारुती मंदिरात पूजा केली होती. शनिवारी सकाळी अमित शहा यांनी सांगितले, ‘चंद्रकांतजींना सांगा, पूजा करायची आहे.’  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तसा निरोप दिला आणि अभिषेकाची सगळी तयारी मी करून दिली.’’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2014 2:30 am

Web Title: modi amit shah blessed by khuldabad south faced maruti says chandrakant khaire
टॅग : Chandrakant Khaire
Next Stories
1 उद्योगांना मान्यतेची प्रक्रिया सुलभ करणार- मुख्यमंत्री
2 नवा आकृतीबंध शिक्षकेतरांच्या मुळावर
3 रक्तक्रांतीत फुललेल्या जहाल गोपीच्या प्रेमकहाणीचा अंत!
Just Now!
X