नरेंद्र मोदी भांडवलदारांचे हस्तक असून त्यांचे हात रक्ताने माखले असल्याचा आरोप माकपचे माजी खासदार निलोत्पल बसू यांनी केला. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील माकप डाव्या आघाडीचे उमेदवार डी. बी. नाईक यांच्या प्रचाराची सभा महात्मा गांधी चौकात झाली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी बसू यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. एकानंतर एक घोटाळे, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आदी विषयांचा समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी व नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी लागणाऱ्या खर्चावरसुद्धा त्यांनी टीका केली. मोदींच्या सभेवर १० ते १५ हजार कोटी रुपये खर्च होत आहे. गुजरात येथे नॅनो उत्पादनासाठी टाटांना योग्य दराने जमीन दिली असती तर ३३ हजार कोटी रुपयांचा कर शासनाकडे जमा झाला असता. तो माफ करण्यात आला. मोदी हे भांडवलदारांचे हस्तक आहेत. बसू यांनी अमित शहा यांच्यावरही टीका केली.