मुंबईच्या हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जण हकनाक बळी गेले, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिक्रिया देतात, मात्र माझ्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करतात यावर भाष्य करण्यास वेळ नाही अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी औदुंबरच्या सदानंद साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केली. राज्यातील शहरे गिळली जात असताना साहित्यिकांनीही आज आपल्या साहित्याच्या माध्यमातून आवाज उठवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र जाती-पातीच्या विळख्यात अडकत चालला असून हे राज्याला परवडणारे नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत साहित्यिकही रस्त्यावर उतरले होते. मात्र आज मराठी माणूसच जर संपला तर मराठी भाषा कशी टिकणार? दक्षिणेतील तीन भाषांना अभिजात दर्जा मिळतो मात्र, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही असा सवाल करून श्री. ठाकरे म्हणाले की, गुजराथी भाषेला अर्ज न करताही हा दर्जा मिळू शकेल. राज्य अथवा सरकार कोणाचे आहे हे न पाहता साहित्यिक, कवी यांनी आपली मराठी माणसाच्या हिताची भूमिका ठामपणे घेण्याची गरज आहे. अन्यथा भावी पिढी आपणास माफ करणार नाही.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा आग्रह कशासाठी, असा सवाल करीत आज बाहेरचे लोक येतात आणि मराठी माणसाच्या हक्काचे घेत आहेत. आता मुंबई-बडोदा एक्सप्रेस हायवे होणार आहे हे कशासाठी, याचा मराठी माणसाला कितपत लाभ होणार आहे याचा विचार कधी करणार? पंतप्रधान जर गुजरातच्या भल्याचा विचार करीत असतील तर मी मराठी माणसाचा विचार केला तर त्यात वावगे वाटण्याचे काहीच कारण नाही. अन्य राज्यात केवळ निवडणुकीपुरते एकमेकांच्या विरोधात असतात, राज्याच्या अस्मितेचा प्रश्न असला तर सर्वजण एकत्र येतात अगदी कावेरीच्या पाण्याच्या प्रश्नी देशाने बघितले आहे, मग अशा एकजुटीपुढे केंद्र शासनालाही नमते घ्यावे लागते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत साहित्यिकांनी मोलाची कामगिरी केली. अगदी रस्त्यावर उतरण्यापासून लेखणीच्या माध्यमातून उठावाला दिशा देण्याचे काम केले. आजही मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील शहरे गिळंकृत करायचा प्रयत्न होत आहे अशा वेळी साहित्यिकांनी आपली भूमिका कठोरपणे बजावावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.