राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या खळबळजनक आरोपाने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. भाजपा या मुद्यावरून आक्रमक झाली आहे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आता ठाकरे सरकारला धारेवर धरणं सुरू केलं आहे. त्यामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार समोर नवा पेच निर्माण झाला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज (रविवार) पत्रकारपरिषद घेऊन याबाबतची काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. तसेच, यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपावर जोरदार टीक देखील केली.

सचिन सावंत म्हणाले, ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात जाणीवपूर्वक निर्माण केलं जातं आहे, हे वातावरण देश पातळीवरती जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकारं आहे, तिथं निर्माण केलं जातं. ही याची पार्श्वभूमी आहे. म्हणूनच या संपूर्ण प्रकाराच्या पार्श्वभूमीकडे मी माध्यमांद्वारे मी जनतेचं लक्ष वेधू इच्छित आहे.

तसेच, ”या देशात विरोधी पक्षांची सरकारं टिकू दिली जात नाहीत, आणि त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची मोदी सरकारची व भाजपाची तयारी असते, हे वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचं काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न झाले. राजस्थानमध्ये काँग्रेसचं गेहलोत सरकार पाडण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न झाले, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे साम दाम दंड भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत सत्ता परिवर्तन करायचं, सत्ता बळकवायची, जनतेनं पाठिंबा दिला नसेल, तर तो पाठिंबा गैर मार्गाने मिळवण्याचा भाजपाचा सातत्याने प्रयत्न असतो. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जातोय, हे वेळोवेळी दिसतं आहे. वर्षभरापासून महाविकासआघाडी सरकार ज्या पद्धतीचे अत्याचार केंद्र सरकारकडून सहन करत आहे. वेळो वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकऱणात तीन-तीन तपास यंत्रणांना आणलं गेलं, मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली ही पार्श्वभूमी आपल्याला विसरता येण्यासारखी नाही. एकंदरच या सर्व यंत्रणासाठी राजकीय स्वार्थासाठी वापर केला जातो आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही.” असं देखील त्यांनी बोलून दाखवलं.

याशिवाय, ”महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्याचा पूर्ण डाव भाजपाचा आहे, त्याच्यावर माध्यमांमधील एक भाग चालतो आहे ही वस्तूस्थिती आहे. मोठ षडयंत्र रचण्याची भाजपाचा क्षमता या अगोदर देखील दिसून आलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा व अधिकाऱ्यांवर कशाप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा दबाव आहे, हे देखीवल आपण पाहिलेलं आहे.” असं सावंत म्हणाले.