भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संपर्क फॉर समर्थन उपक्रम सुरु केला असून बुधवारी त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली. या भेटीनंतर आता काँग्रेसने भाजपावर पलटवार केला असून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी माधुरी दीक्षित आणि उद्योगपती रतन टाटा यांना पत्र पाठवून केंद्रातील मोदी सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरत असल्याची टीका केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ‘संपर्क फॉर समर्थन’ हा उपक्रम सुरु केला असून या अंतर्गत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीची भेट घेऊन सरकारने केलेल्या कामकाजाची माहिती दिली जाणार आहे. यासाठीच अमित शाह यांनी बुधवारी माधुरी दीक्षित आणि रतन टाटा यांची भेट घेतली होती. या भेटीगाठींवर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी माधुरी दीक्षित आणि रतन टाटा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मोदी सरकार आर्थिक, आंतरराष्ट्रीय संबंध अशा सर्वच स्तरावर अपयशी ठरल्याची टीका केली आहे.

शेतकरी, लघु उद्योजक आणि कामगार वर्गात सरकारविरोधात नाराजी असून गेल्या काही पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव झाला आहे, याकडेही संजन निरुपम यांनी लक्ष वेधले आहे. मोदी सरकारने कला क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित घेतलेले वादग्रस्त निर्णयांची तुम्हाला माहिती असेलच, असेही निरुपम यांनी या पत्रात म्हटले आहे.