चंद्रपूर : पेट्रोलने शंभरी गाठली आहे. डिझेल शंभरीच्या जवळ आहे. गॅस सिलिंडरचे दर नऊशे रुपये झाले आहे. देशाचा जीडीपी बांगलादेशापेक्षाही घसरला आहे. देशात महागाई वाढीला मोदी सरकार जबाबदार आहे. सरकार चालवता येत नसल्यास मोदी सरकारने चालते व्हावे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे मोदी सरकारला भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी दिला.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे सोमवारी येथील आदर्श पेट्रोल पंप येथे पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी खासदार बाळू धानोरकर बोलत होते. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे उपस्थित होते. खासदार धानोरकर म्हणाले, आधीच करोनाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या असतानाही पेट्रोल, डिझेलच्या किमतीवर परिणाम झाला नाही. सामान्य माणसांना दिलासा देण्याचीच भूमिका घेतली होती. मात्र, आताचे मोदी सरकार सामान्य जनतेच्या मुळावर उठले आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी काहीही परिणाम होताना दिसत नाही. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, नगरसेविका सुनीता लोढिया, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, नगरसेवक प्रशांत दानव, नगरसेवक प्रदीप डे, संतोष लहामगे, नगरसेविका ललिता रेवल्लीवार, शालिनी भगत, सचिन कत्याल, उमाकांत धांडे, रुचित दवे सहभागी झाले होते. वरोरा येथे खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, विलास टिपले यांच्या नेतृत्वात इंधर दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. राजुरा येथे आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात पेट्रोल पंप येथे आंदोलन केले गेले. बल्लारपुरात घनश्याम मुलचंदानी, मूल, सावली येथे संतोष रावत, संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

आंदोलन करताना खासदार बाळू धानोरकर, काँग्रेस शहराध्यक्ष रितेश तिवारी