देशाचं अर्थचक्र पुनरुज्जीवित करण्यासाठी मोदी सरकारने योग्य ते सगळे प्रयत्न केले पाहिजेत. करोनाचं संकट देशावर आहे त्यामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर येणारं मोठं संकट हे आर्थिक संकट आहे. देशाचं अर्थचक्र सुरु करण्यासाठी मोदी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. सगळं काही सुरळीत झाल्यानंतर सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवावी. अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी काय करता येईल याची सल्लामसलत करावी आम्ही राजकारण बाजूला ठेवून त्यांना सहकार्य करु असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘साठीचा गझल .. महाराष्ट्राचा‘ या ‘लोकसत्ता‘तर्फे  राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता वेबसंवादात सहभागी झाले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. याच कार्यक्रमात निरंजन हिरानंदानी यांनी शरद पवार यांना लॉकडाउन कधी संपेल आणि त्यानंतर काय उपाय योजावे लागतील या आशयाचा प्रश्न विचारला. या प्रश्नाला शरद पवार यांनी सविस्तर उत्तर दिलं.

“करोनाचं जे संकट सध्या जगावर, भारतावर आहे. त्यामुळे जी काळजी घेतली आहे ती योग्यच आहे.  देशभरात लॉकडाउन आहे. मात्र या संकटातून बाहेर पडल्यानंतर आपल्यासमोर मोठं संकट उभं राहणार आहे ते आर्थिक संकट आहे. बेरोजगारी वाढू शकते. शेतीक्षेत्र, रिअल इस्टेट, इतर इंडस्ट्री या सगळ्यांना फटका बसणार आहे. काही व्यवसाय किंवा उद्योग बंदच पडतील की काय? अशीही भीती मला वाटते” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

“लॉकडाउन संपल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये केंंद्र सरकारला भरीव काम करावं लागेल. या सेक्टरला पुनरुज्जीवन देण्यासाठी काही सवलती या सलग द्याव्या लागतील. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारे कामगार बसून आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना मदत करायला हवी. इन्फ्रास्ट्रक्चरला बळ द्यावंच लागणार, त्याशिवाय पर्याय नाही” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “इन्फास्ट्रक्चर सेक्टरमध्ये भरीव काम केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. या सेक्टरला पुनरुज्जीवन करण्यासाठी काही सवलती द्यायला हव्यात गुंतवणूक केली गेली पाहिजे. अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना सहकार्य करु” असंही त्यांनी म्हटलं आहे.  मी याबाबत पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना या संदर्भात तीन पत्रं पाठवली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर सगळं सुरळीत झाल्यानंतर आम्ही दिल्लीला जाणार आहोत.

केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाबाबत काही मतभेद जरुर आहे. मात्र त्याबद्दल बोलण्याची ही वेळ नाही. अर्थचक्र सुरु करणं देश सावरणं हे महत्त्वाचं आहे. करोनाचा प्रादुर्भाव देशात पसरल्यानंतर एका वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं झालं. मात्र त्यावेळी अर्थव्यवस्थेबाबत किंवा काही सुधारणा यांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली नाही. सध्या कोणतंही राजकारण करण्याची वेळ नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.