देशातील प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार हा केवळ जुमला होता असं भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी यापूर्वीच जाहीर केलंय. मात्र, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा 15 लाख रुपयांबाबत चर्चा सुरू झालीये. मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार असल्याचं आठवले म्हणालेत.

सोमवारी(दि.17) सांगली जिल्ह्यातील्या इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आठवले यांनी मोदी सरकार प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार असल्याचं म्हटलं. एवढी मोठी रक्कम सरकारकडे नाहीये, त्यासाठी आरबीआयकडे पैसेही मागितले पण त्यांनी नकार दिलाय. त्यामुळे हे पैसे एकत्र टाकले जाणार नाहीत. टप्प्याटप्प्याने हे पैसे टाकले जातील. रिझर्व्ह बँकेशी याबाबतची बोलणी सुरु असून लवकरच पैसे जमा होतील असं आश्वासन आठवले यांनी दिलं आहे. तसंच जीएसटीचा कर कमी करणे, पेट्रोलियम पदार्थाचे दर आणि महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करेल,’ अशी माहितीही त्यांनी दिली. शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मुद्दाही एनडीएच्या बैठकीत मांडला असल्याचं आठवलेंनी सांगितलं.

या पत्रकार परिषदेत बोलताना 2019 मध्ये एनडीएचेच सरकार येईल आणि मोदीच पंतप्रधान होतील, पुढील दहा वर्षे मोदीच पंतप्रधान राहतील असंही आठवले म्हणाले.