पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘दयावान’ असा उल्लेख करीत, बिहारप्रमाणे महाराष्ट्रालाही आर्थिक मदत करावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असे सांगताना कर्जमुक्ती मागणीवरही शिवसेना ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली.

जिल्हय़ातील खुलताबाद येथे एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे वाटप ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तेवढय़ाच किमतीच्या धान्याची मदत फुलंब्री तालुक्यात करण्यात आली. मराठवाडय़ात दुष्काळाची स्थिती भीषण आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता मदत देण्याची गरज आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी, बिहारसाठी सव्वालाख कोटी रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिली. आता त्यांनी महाराष्ट्रालाही भरीव मदत द्यावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या जेल भरो आंदोलनावरही त्यांनी यावेळी टीकास्त्र सोडले.