पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये इको-प्रोच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख

फळाची अपेक्षा न करता एखादे कार्य सकारात्मक पद्धतीने ध्येय म्हणून स्वीकारले तर निश्चितच त्याचा गौरव होतो, हे इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन म्हणजेच ‘इको-प्रो’ या स्वयंसेवी संस्थेने श्रमदानाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छ अभियानातून प्रेरणा घेत इको-प्रोच्या ९४ स्वयंसेवकांनी २३० दिवसांत ७ किलोमीटरचा किल्ला, २५ बुरूज, ४ प्रवेशद्वारे व ४ खिडक्या स्वच्छ करून जनसामान्यांना स्वच्छता अभियानाचे महत्त्व पटवून दिले. त्याचा परिणाम पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या विशेष कार्यक्रमात इको-प्रो या स्वयंसेवी संस्थेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ‘इको प्रो’च्या या कार्यामुळे चंद्रपूरचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

देशातील सर्वाधिक प्रदूषित जिल्हा अशी चंद्रपूरची ओळख आहे. वनसमृद्धीने नटलेल्या या जिल्हय़ात घनदाट जंगल आणि ८८ वाघ आहेत. निसर्गाची कृपादृष्टी असली तरी प्रदूषणामुळे अनेकांना हा जिल्हा नकोसा झाला आहे. त्यामुळेच येथून इतरत्र स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा या शहरात केंद्र व राज्य सरकारने ताडोबाच्या जंगलालगत मूळ मार्गावर लोहारा गावापासून, तर चिचपल्लीपर्यंतचे जंगल अदानी उद्योग समूहाला कोळसा खाणीसाठी देऊ केले. या खाणीला तेव्हा प्रखर विरोध झाला आणि त्याच वेळी बंडू धोतरे हे अडगळीतील नाव सर्वप्रथम चर्चेत आले. त्यांनी बेमुदत उपोषण करून अदानीच्या खाण प्रकल्पाला जिल्हय़ातून हद्दपार केले. त्यानंतर त्यांच्या ‘इको-प्रो’ या स्वयंसेवी संस्थेचा जन्म झाला आणि या संस्थेने पर्यावरण, वन्यजीव व सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले.

नेहमीच आगळे काम करण्यावर विश्वास असलेल्या या संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता अभियानातून स्वच्छतेची प्रेरणा घेतली. मात्र आपली मोहीम केवळ रस्ते साफ करणे आणि सेल्फी काढण्यापुरती मर्यादित होऊ नये यासाठी म्हणून धोतरे यांनी ‘किल्ला स्वच्छता अभियान’ ही वेगळी वाट निवडली. संस्थेत शंभराच्या वर क्रियाशील सदस्य असतानाही १ मार्च २०१७ रोजी त्यांनी स्वत: किल्ल्यावर जाऊन हाती झाडू घेत स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला. पहिले एक-दोन दिवस धोतरे यांनी एकटय़ानेच सफाई केली. त्यानंतर तीन ते चार सहकाऱ्यांची भर पडली. कुठलीही बैठक न घेता स्वच्छतेचे महत्त्व सर्व सदस्यांना पटल्याने हळूहळू इको-प्रोचे सर्व सदस्य या सफाई अभियानात उतरले. त्यानंतर खऱ्या अर्थाने या अभियानाची सुरुवात झाली. दररोज सकाळी ६ ते १० या वेळेत २५ ते ३० सहकाऱ्यांसह धोतरे किल्ल्यावर दाखल व्हायचे आणि स्वच्छतेला सुरुवात करायचे. अगदी सुरुवातीला लोकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. अनेकांना तर इको-प्रोला महानगरपालिकेने स्वच्छतेचे कंत्राट दिले आहे, इथपासून तर वेगवेगळय़ा प्रकारची टिप्पणी झाली. कालांतराने किल्ल्याची स्वच्छता लोकांच्या दृष्टिपथात येत गेल्यानंतर लोकांनीही या अभियानाचे कौतुक केले. यानंतर मात्र सर्वाचाच उत्साह वाढत गेला आणि लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. अभियानाला सुरुवात केली, तेव्हा किल्ल्यावर वाढलेल्या वृक्षवेली, गवत व घाण साफ करणे असेच स्वरूप होते. मात्र, किल्ल्याच्या आजूबाजूला लोकांनी पक्केबांधकाम करताना त्याचे वेस्ट तिथेच फेकून दिले आहे. तसेच किल्ल्यालगत नाली नसल्यामुळे घरातून निघणारे सांडपाणी तिथेच साचले आहे. त्यामुळे सर्वत्र घाण झालेली होती. हे सर्व इको प्रोच्या स्वयंसेवकांनी हाती फावडा, टिकास व झाडू घेऊन स्वच्छ केले. आज या मोहिमेला २३० दिवस पूर्ण झालेले आहेत. या २३० दिवसांमध्ये शहर स्वच्छतेचा एक सकारात्मक संदेश लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्याचाच परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची दखल घेत ‘मन की बात’ या कार्यक्रमात स्वच्छतेच्या या सातत्यपूर्ण अभियानाचा तसेच अभियानातील सहभागी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. स्वच्छताच नाही तर आपला ऐतिहासिक वारसा जतन केला जावा याकरितासुद्धा या अभियानाचे महत्त्व असून अशा प्रकारे सर्व ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात कार्य केले गेले पाहिजे, असा उल्लेखसुद्धा पंतप्रधानांनी केला आहे.

किल्ल्याची भिंत, २५ बुरूज, प्रवेशद्वारे व खिडक्या स्वच्छ

या अभियानात चंद्रपूर शहरात गोलाकार बांधण्यात आलेल्या गोंडकालीन ५५० वष्रे जुना किल्ला परकोट जो जवळपास ११ किमी बांधण्यात आलेला आहे. आज या किल्ल्याची परिस्थिती भग्न स्वरूप झालेली आहे. यावर मोठय़ा प्रमाणात वृक्षवेली, झाडीझुडपे वाढलेली होती. मोठय़ा प्रमाणात घर बांधकामाचे वेस्ट या किल्ल्याच्या पादचारी मार्गावर फेकण्यात आलेले होते. तसेच किल्लालगतच्या घरातील अडगळसुद्धा यावर ठेवण्यात आलेली होती. ही सर्व सफाई करून किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज ११ किमी किल्ल्याच्या भिंतीपैकी जवळपास ७ कि.मी. लांबीची भिंत स्वच्छ करण्यात आलेली आहे. एकूण ३९ बुरुजांपैकी २५ बुरूज स्वच्छ करण्यात आलेले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे २९ सप्टेंबर २०१७ रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर किल्ल्यावर स्वच्छता अभियानात स्वत: श्रमदानाकरिता सहभागी झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या अभियानाची माहिती पंतप्रधान कार्यालयाला दिली. पंतप्रधान कार्यालयाने या माहितीची दखल घेत या अभियानाची विस्तृत माहिती इको-प्रो या संस्थेकडून जाणून घेतली व त्यानंतर पंतप्रधानांनीच या स्वच्छता अभियानाचा गौरव करून इको-प्रो या स्वयंसेवी संस्थेवर कौतुकाचा वर्षांव केला. तसेच पुरातत्त्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची इको-प्रोच्या शिष्टमंडळाची भेट घडवून दिली. पुरातत्त्व विभागानेही या अभियानाचे कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची ‘मन की बात’मध्ये दखल घेतल्याने चंद्रपूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर गेले आहे हे इको-प्रोसाठी अभिमानास्पद आहे. या कौतुकामुळे जबाबदारीही वाढली आहे. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम किल्ल्यापुरती मर्यादित न राहता त्याला व्यापक स्वरूप देण्याचा विचार आहे. या अभियानाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले. पंतप्रधानांनी केलेले कौतुक ही त्याचीच पावती आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक व्यापक होईल. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटेल आणि लोकही या मोहिमेत सहभागी होईल, असा विश्वास आहे.

बंडू धोतरे, संस्थापक अध्यक्ष, इको- प्रो, चंद्रपूर