News Flash

मोदींची ‘लाट’, जाधवांचे ‘ललाट’!

भविष्यात विधानसभा निवडणूक जास्त कटकटीची जाईल, त्यापेक्षा लोकसभा लढवून आपले ‘ललाट’ आजमावून पाहू या भूमिकेतून निवडणूक लढविणाऱ्या संजय जाधव यांना मोदी लाट लाभदायी ठरली.

| May 19, 2014 01:57 am

भविष्यात विधानसभा निवडणूक जास्त कटकटीची जाईल, त्यापेक्षा लोकसभा लढवून आपले ‘ललाट’ आजमावून पाहू या भूमिकेतून निवडणूक लढविणाऱ्या संजय जाधव यांना मोदी लाट लाभदायी ठरली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची मदत या लाटेवर स्वार होण्यासाठी निर्णायक राहिली. थेट लढतीतही विक्रमी मताधिक्याने बालेकिल्ला राखत जाधव यांचे नेतृत्व या निवडणुकीने आणखी प्रभावी झाले.
शिवसेनेत सामान्य कार्यकर्त्यांपासून शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, आमदार अशी चढत्या क्रमाने वाटचाल करणाऱ्या जाधवांनी एका अर्थाने शिवसेना एखाद्या कार्यकर्त्यांला किती देऊ शकते, तेही दाखवून दिले. शिवसेनेत लोकसभेसाठी अर्धा डझन इच्छुकांची रांग होती. मात्र,  जिल्हाभर ‘क्रेझ’ असल्यानेच जाधव यांना उमेदवारी मिळाली. खासदार फुटीची परंपरा असूनही प्रत्येक वेळी शिवसेनेच्या पदरी भरभरून मतदान टाकणारा हा मतदारसंघ. सर्वच प्रस्थापित नेतृत्वाला सुरूंग लावणारी मोदी लाट आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्याविरोधात आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, आमदार सीताराम घनदाट या नेत्यांची पक्ष-निरपेक्ष मदत यामुळे जाधवांचा विजय सोपा झाला. निवडून येऊ याची खात्री होतीच; पण विक्रमी मताधिक्य मिळेल याची त्यांनी अपेक्षाही केली नव्हती.
परभणीची लढाई चुरशीची झाली असली, तरीही मोदी लाट एवढी जबरदस्त असेल याचा कोणालाही अंदाज आला नाही. कोणालाही  विचारले तर तो निवडणूक अत्यंत चुरशीची झाली हेच सांगत होता. जो उमेदवार येईल तो २०-२५ हजार मतांनी निवडून येईल, असेच लोक बोलत होते. सेनेची जागा निवडून आली तरी ती सव्वालाखाच्या मताधिक्याने निवडून येईल, याचा दावा खुद्द सेनेचेही पदाधिकारी करीत नव्हते. याचा अर्थ लोकांनी कुठेही बोलून दाखवले नाही; पण जो कौल द्यायचा तो दिला.
राष्ट्रवादीचे भांबळे यांनी जेथे जेथे मोठय़ा सहकार्याची अपेक्षा बाळगली, तेथे तेथे त्यांचा भ्रमनिरास झाला. ज्या घनसावंगी मतदारसंघाने गेल्या लोकसभा निवडणुकीत वरपुडकरांना मताधिक्य दिले, त्याच मतदारसंघाने या वेळी सेनेच्या बाजूने मोठा कौल दिला. आघाडी सरकारातील मंत्र्यांविरुद्ध रोष होताच, तर तो टोपे यांच्याविरुद्धही असणारच आणि तो आता उघड झाला. घनसावंगीत तब्बल २६ हजारांचे मताधिक्य सेनेला मिळाले. परतूर मतदारसंघानेही तब्बल ३० हजारांचे मताधिक्य जाधवांच्या पारडय़ात टाकले. भांबळे यांना घनसावंगी व परतूरमधून अपेक्षा होत्या, त्या सपशेल खोटय़ा ठरल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत वरपुडकरांना परभणी विधानसभा क्षेत्रातून ८ हजारांचे मताधिक्य होते. या वेळी राष्ट्रवादी नेतृत्वाला परभणीतून मोठे मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, केवळ दहा हजारांचे मताधिक्य या मतदारसंघाने दिले.
उर्वरीत पाचही विधानसभा मतदारसंघांत सेनेलाच जबरदस्त आघाडी मिळाली. खुद्द भांबळे यांच्याच मतदारसंघात त्यांना थांबविण्यात सेना यशस्वी झाली. यात बोर्डीकरांचे परिश्रम निश्चित आहेत; पण या मतदारसंघात शेवटच्या टप्यात झालेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या जाहीर सभेने सगळी गणिते बदलली. जेथे स्वतच्या मतदारसंघात मोठा दगाफटका झाला, तेथे अन्य मतदारसंघांतून भांबळेंना मदत मिळेल, अशी अपेक्षाच चूक ठरली.
पाथरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीला अपेक्षित आकडा गाठता आला नाही. गंगाखेडने तर जाधवांच्या एकूण मताधिक्याचा निम्मा वाटा उचलला. आजवर सरळ लढतीत केवळ सुरेश वरपुडकरांनीच १९९८ मध्ये लोकसभेचा विजय मिळवला. या वेळी थेट लढत असूनही राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला, ही बाब विशेष उल्लेखनीय. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी या निकालाने अनेकांना शहाणे केले आहे. कोण किती पाण्यात आहे ते या निकालाने स्पष्ट झाले. विधानसभा निवडणुकीत आता वरपुडकर-बोर्डीकरांची भूमिका काय, ते दोघेही पक्षाकडूनच निवडणूक लढवतील काय, यासारखे प्रश्न आहेत तसेच परभणीत आता जाधव यांचा उत्तराधिकारी कोण, असाही प्रश्न आहेच. येत्या काळात जिल्ह्यातले राजकारण आणखी गतिमान बनेल. जाधव यांनी बालेकिल्ला राखून झुंज दिली, त्यामुळे राजकारणात त्यांचा दबदबा वाढला असून आज त्यांना मदत करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठीही भविष्यात जाधवांचे नेतृत्व आव्हानच राहील. परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला होताच, आता जाधवांच्या विजयाने तो आणखी भक्कम झाला.
परभणी मतदारसंघ सातत्याने विरोधी पक्षाचा राहिला. विरोधी पक्ष असल्याने विकासकामे होत नाहीत, अशी तक्रार सेनेचे लोकप्रतिनिधी सातत्याने करीत. आजवरच्या सेनेच्या खासदारांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही भरीव योगदान दिले नाही. खासदार जाधव यांनी परभणी लोकसभा मतदारसंघ विकासास ठोस प्रयत्न केले, तर आधीची नाकर्त्यां खासदारांची परंपरा मोडीत निघून नवा अध्याय त्यांच्या नावे लिहिला जाईल, त्या दृष्टीनेही त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 1:57 am

Web Title: modi wave jadhav lalat
टॅग : Modi Wave
Next Stories
1 ‘आप’पेक्षा ‘नोटा’च भारी!
2 शेतकऱ्यांनी ज्ञान, विज्ञान व व्यापार त्रिसूत्री अवलंबावी -डॉ. पाटील
3 राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा सुरळीत
Just Now!
X