नगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा तालुक्यात देवदैठण येथे स्वयंचलित हवामान केंद्राच्या पाऊस मापनात फेरफार क रण्यात आल्याचा प्राथमिक माहिती अहवाल कृषी विभागाने पोलिसात दाखल केला आहे. राज्य सरकारच्या हवामान विमा योजनेचा गैरफायदा घेण्याच्या उद्देशाने बोगस दावे करण्याचा हेतू यात असावा, असा अंदाज असून या घटनेच्या पाश्र्वभूमीवर हवामान केंद्रांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याबाबत राज्याचा कृषी विभाग विचार करत आहे.

हवामान पीक विमा योजनेत केळी व डाळिंब यासारख्या पिकांना विमा दिला जातो. प्रत्येक महसूल परिक्षेत्रात असलेल्या २०९२ हवामान केंद्रांतून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे विमा दावे मंजूर केले जातात.

प्रत्येक महसूल परिक्षेत्रात पाच ते दहा गावांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिलेली आहे. या हवामान केंद्रातील माहिती दर दहा मिनिटाला कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होत असते.

या प्रकरणी चौकशीसाठी महसूल, कृषी अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांनी त्या भागात किरकोळ पाऊस झाल्याचे सांगितले. त्यामुळे पर्जन्यमापकात कुणीतरी पाणी ओतून फेरफार करण्याचा प्रयत्न केला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्यात पर्जन्यमापकात फेरफार करण्यात आल्याची  फिर्याद देण्यात आली.

हवामान केंद्रांच्या सुरक्षेचा मुद्दा कृषी विभागाकडील पीक विमा योजना व महसूल विभागाकडून त्यानुसार दिली जाणारी नुकसान भरपाई यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आकडेवारी संकलित करणाऱ्या केंद्रात छेडछाड करण्याचा प्रकार देवदैठण येथे घडल्यानंतर नगर जिल्ह्य़ातील ९७ महसूल मंडळातील हवामान केंद्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्य़ात श्रीगोंदा तालुक्यात देवदैठण येथे २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस झाल्याची माहिती हवामान केंद्राने दिली होती. ’प्रत्यक्षातील इतर पूरक घटकांची माहिती त्याच्याशी जुळणारी नव्हती. २८ ऑगस्टला या केंद्रावर ९ मि.मी. पाऊस दाखवण्यात आला. पण तो खूप जास्त होता.
  • एका दिवशी १० मिनिटांत ५९ मि.मी. पावसाची नोंद दाखवली गेली. त्याचा अर्थ तेथे ढगफुटी झाली, पण प्रत्यक्षात तसे काही झालेले नव्हते असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अशा प्रकारच्या काही घटना यापूर्वी घडल्या होत्या. नगर जिल्ह्य़ातील घटना लक्षात घेऊन हवामान केंद्रांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याबाबत विचार करावा लागेल. त्याच्या कार्यवाहीसाठी आवश्यक तो प्रस्ताव कृषी विभागाकडून तयार केला जाईल.

– धीरज कुमार, कृषी आयुक्त

किती हवामान केंद्र सरकारी जागेत व खासगी जागेत, त्याची आकडेवारी आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही. या केंद्राची काळजी गावकऱ्यांनी तसेच ज्या सरकारी कार्यालयाच्या आवारात केंद्र आहे, तेथील कर्मचाऱ्यांनी घेणे अपेक्षित आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. या केंद्राभोवती तारेचे कुंपण घातले गेले आहे. देवदैठणचे केंद्र तलाठी कार्यालयाच्या आवारात आहे. केवळ अशा केंद्राच्या आकडेवारीवर कृषी विभाग अवलंबून नाही. देवदैठणच्या घटनेनंतर आता सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

– शिवाजीराव जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर.

स्कायमेट कंपनीची जिल्ह्य़ात ९७ केंद्रे आहेत. त्यातील सात तालुक्यातील केंद्रांची देखभाल माझ्याकडे आहे. देवदैठण येथील केंद्रात झालेली छेडछाड जाणून-बुजून केली गेली असावी असे वाटते. यापूर्वी अशी घटना घडली नाही. पुन्हा असा प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

– गणेश देशमुख, क्षेत्रीय निरीक्षक, स्कायमेट