लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मोदींची वाटचाल सध्या हुकुमशाही मार्गाकडे सुरू आहे. जर्मनीमध्ये हिटलरने ज्या पद्धतीची शासन व्यवस्था राबविली, त्या दिशेने वाटचाल करणाऱ्या, अल्पसंख्याकांना जिवंत जाळण्याच्या विचारांचे समर्थन करणाऱ्या मोदी आणि तत्सम विचारांना देशातील सुजाण नागरिक कधीच भीक घालणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी उस्मानाबाद शहरात पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी पालकमंत्री मधुकर चव्हाण, आमदार राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे, विक्रम काळे, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पवार म्हणाले की, माध्यमांनी केवळ मोदींचे दर्शन घडविण्याचे काम सुरू केले आहे. भाजपा तर सोडा, आता शिवसेनाही मोदींच्या नावाचा जप करीत आहे. ज्या बाळासाहेबांनी शिवसेना निर्माण केली त्यांचादेखील मोदींसमोर शिवसेनेला विसर पडला आहे. देशाच्या हिताची जपणूक करण्याच्या निर्णयाची ही निवडणूक आहे. त्यासाठी देशातील सामान्य नागरिक आघाडीच्याच पाठिशी खंबीरपणे उभा राहील.
ज्यांना निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान पदाचे स्वप्न पडत आहे. त्यांनी देशहिताचे काय काम केले, असा सवाल उपस्थित करीत पवार यांनी स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात काँग्रेस पक्षाने दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. अनेकांनी हौतात्म्य पत्करले, रक्त सांडले. त्यावेळी मोदी विचारांचे लोक कुठे होते? सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारला जात आहे. पटेल आज असते तर त्यांनी स्पष्ट सांगितले असते, पुतळा नको, शेतकऱ्यांचे दुख दूर करा. निवडणुका होण्यापूर्वी सामान्य नागरिकाने मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी ज्यांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे, ते देशातील शेतकऱ्यांना काय न्याय देणार, असेही पवार म्हणाले.
पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या आघाडी सरकारला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही डॉ. पाटील यांच्या विकासकामांची पावती म्हणून  भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले.