अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहमद हुसेन खान यांचे प्रतिपादन

‘भारतमाता की जय’ या घोषणेसाठी एकीकडे मुख्यमंत्री फडणवीस खुर्ची सोडण्याची भाषा करत असतानाच राज्य शासनाच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहमद हुसेन खान यांनी ही घोषणा कोणावरही लादणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन करत मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला छेद दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील अल्पसंख्य समाजासाठी शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी खान मंगळवारी येथे आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, भारत देशाशी प्रत्येकाने इमान राखले पाहिजे, ही भूमिका योग्य आहे.

त्याच भावनेने या देशातील सर्वधर्मीयांनी वागावे, हे नैसर्गिक आहे. पण ‘भारतमाता की जय’ या घोषणेचा आग्रह धरत हा विषय अशा प्रकारे पेटवणे योग्य नाही. आम्ही भारतीय आहोत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण मुस्लीम धर्मामध्ये ‘पूजनीय’ ही संकल्पनाच मान्य नाही. मातेचा आदर सर्वचजण करतात. पण या देशाची देवता म्हणून संकल्पना मान्य होण्यासारखी नाही. अर्थात हा प्रत्येकाच्या मानण्या-न मानण्याचा प्रश्न आहे. ज्याने त्याने आपापल्या रिवाजानुसार वागावे. मात्र त्याबाबत बळजबरी करणे अयोग्य आहे.

पर्सिनेट नौकेव्दारे मासेमारीवर शासनाने घातलेले र्निबध हानिकारक असल्याचे मत व्यक्त करून खान म्हणाले की, या संदर्भात कोणीतरी गैरसमज करून दिल्याने हा निर्णय घेतला गेला असावा, असे वाटते. पण त्यामुळे केवळ मच्छिमारांचेच नव्हे तर, या व्यवसायाशी निगडित अन्य व्यवसाय आणि वित्त संस्थांचेही नुकसान झाले आहे. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याबरोबर या संदर्भात पुन्हा बैठक घेऊन र्निबध उठवण्यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र यंदाचा हंगाम पर्सिनेटधारकांना मोठा आर्थिक फटका देऊन गेला आहे. हे नुकसान भरून येण्यासारखे नाही.