देशात परिवर्तन होऊन केवळ सहा महिने झाले आहेत. मोदी सरकारकडून चांगल्या कामगिरीचे संकेत आहेत, त्यांना अजून वेळ द्यायला हवा असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशात परिवर्तन घडल्याने नवचैतन्य निर्माण झाल्याचे म्हटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे(आरएसएस) विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्रपूजन करुन पथसंचलन करण्यात आले त्यावेळी स्वयंसेवकांना संबोधित करताना ते बोलत होते.
आपल्या भाषणाच्या सुरूवातीला मोहन भागवत यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळयान मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांनचे अभिनंदन केले. सोबत आशियाई स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱया खेळाडूंचेही त्यांनी कौतुक केले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्व सुविधा पोहोचत नाहीत तोपर्यंत देश विकसीत झाला असे म्हणता येणार नाही असेही ते म्हणाले.
यावेळी भागवत यांनी मोदी सरकारचे तोंडभरून कौतुकही केले. मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वागत करत प्रत्येकाने वैयक्तीक पातळीवर मेहनत घेऊन या अभियानाला हातभार लावण्याचे आवाहनही भागवत यांनी केले.
चीनला भारताने चोख उत्तर द्यावं असं आपण म्हणतो मात्र, आपण चीनच्या वस्तू वापरतो. चीनी वस्तूंची खरेदी बंद करा, तरच देशाची अर्थव्यवस्था सुधारेल असेही भागवत यांनी सांगितले.