News Flash

“सुशांतच्या हत्येची ‘पटकथा’ तयार करणाऱ्यांना डेलकरांच्या आत्महत्येत काहीच काळंबेरं दिसू नये?”

...पण एक खासदार संशयास्पद मृत पावतात, त्यावर कुणी काहीच आपटायला तयार नाही -संजय राऊत

संग्रहित छायाचित्र

सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील एका हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि कंगना रणौत अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या घटनांचा उल्लेख करत राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून डेलकर यांच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “सिल्वासा, दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहनभाई डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात ज्यांनी देशभरात खळबळ माजवली त्या प्रत्येकासाठी डेलकरांची आत्महत्या हे आव्हान आहे. मोहन डेलकरांची आत्महत्या हे साधे प्रकरण वाटत नाही. सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात ‘आत्महत्या करू नये. निराश होऊ नये,’ असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची ‘पटकथा’ तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये? डेलकर यांनी त्यांची जीवनयात्रा संपवली, स्वतःचा अत्यंत दारुण शेवट त्यांनी करून घेतला याबद्दल किती जण हळहळले?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

“मोहन डेलकर हे हिंमतबाज होते, ते पळपुटे नव्हते. ते आत्महत्या का करतील? त्यांना जय-पराजयाची चिंता कधीच वाटली नाही. अशा डेलकरांचा मृतदेह मुंबईतील हॉटेलात फासावर लटकलेला आढळतो व सगळे चूप आहेत. एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरीत्या मृत पावतात त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही. मोहन डेलकर यांनी एक ‘सुसाईड नोट’ गुजरातीत लिहून ठेवली. ही नोट खरी असेल तर त्यात डेलकरांनी नक्की काय लिहिले? दादरा-नगर हवेलीचे प्रशासक डेलकरांचा छळ करीत होते, भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांच्यावर दबाव होता असे त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे,” असा दावा राऊत यांनी सुसाईड नोटचा हवाला देत केला आहे.

“आपल्याला विरोध करणारा राजकारणी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ता, चळवळ यांची मानसिक कोंडी करून त्यांना आत्महत्येच्या कडय़ावर न्यायचेच अशी काही योजना ठरली आहे काय? मोहनने आत्महत्या केली, तो खून नाही हे मान्य केले तर मग ती का केली? असा पुढचा प्रश्न उपस्थित होतो. सिल्वासा, दादरा-नगर हवेली हा लहान केंद्रशासित प्रदेश. त्या प्रदेशातला खरा लोकनेता मोहन डेलकरच होता. अशा मोहन डेलकरांना आत्महत्या करावी लागली. मग त्यांचा वाद कुणाशी होता व शेवटचे प्रोव्होकेशन कोणाचे होते? मोहन डेलकर राजकारणात होते. ते दबंग होते म्हणून त्यांचा संशयास्पद मृत्यू दुर्लक्षित करून चालणार नाही,” असं म्हणत राऊत यांनी या प्रकरणात शंका उपस्थित केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 8:31 am

Web Title: mohan delkar suicide case sanjay raut raised questions about delkar death bmh 90
Next Stories
1 ‘भाजपच्या कृतीला सांगलीतून प्रत्युत्तर’
2 Coronavirus : हिंगोलीत सोमवारपासून सात दिवसांची पूर्णवेळ संचारबंदी
3 खासदार उदयनराजेंनी घेतली राज ठाकरेंची भेट
Just Now!
X