ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या नगर शहरातील, मोहरममधील इमाम हुसेन व इमाम हसन यांच्या सवा-यांच्या मिरवणूक काढून, वाजतगाजत विसर्जन करण्यात आले. मिरवणूक मार्गांवर विविध जातिधर्माच्या भाविकांनी अलोट गर्दी केली होती, सवा-यांवर ठिकठिकाणी चादर चढवण्यात आल्या. यंदा ‘कत्तल की रात्र’च्या मिरवणुकीबरोबरच सवा-यांची मिरवणूकही प्रचंड रेंगाळली. सवा-यांची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मिरवणूक मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरवणुकीत यंदाही यंग पार्टीज्नी ‘डीजे’ला फाटा दिला. मोहरमनिमित्त मुस्लीम-हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असणा-या सवा-यांची स्थापना केली जाते. कोठला भागातील इमामवाडय़ात इमाम हसन यांची तर कविजंग हवेलीत इमाम हुसेन यांची सवारी स्थापन केली जाते. या दोन्ही सवा-यांचे एकत्रित विसर्जन केले जाते. भविक सवा-यांना नवसही बोलतात. वाघाचे पट्टेही अंगावर रंगवतात. आज पारंपरिक मार्गाने विसर्जन मिरवणूक नेण्यात आली.
सोमवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास ‘कत्तल की रात्र’ची मिरवणूक काढण्यात आली. नवसाच्या टेंभ्यांसह महिलाही मोठय़ा प्रमाणावर सहभागी होत्या. ही मिरवणूक नेहमी सकाळी आठ-नऊ वाजेपर्यंत इमामवाडय़ात पोहोचत असे, यंदा मात्र ही मिरवणूक रेंगाळून सकाळी साडेअकराच्या सुमारास इमामवाडय़ात पोहोचली. तरुणांचे गट सवारी खांद्यावर झुलवत नेतात. गटा-तटामुळे वादही होत होते. त्यातूनच मिरवणूक रेंगाळली.
मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आमदार संग्राम जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, पोलीस उपाधीक्षक डी. वाय. पाटील यांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त बडेसाब जहागीरदार, शेख शकुर, सय्यद दस्तगीर, मन्सूर शेख आदी उपस्थित होते. ही विसर्जन मिरवणूकही सुरुवातीपासूनच रेंगाळली. दुपारी अडीचच्या सुमारास इमामवाडय़ाबाहेर पडली. कविजंग हवेलीत इमाम हुसेन यांच्या सवारीची भेट झाल्यानंतर, दोन्ही सवा-या पुढे मार्गस्थ झाल्या. नेहमी सायंकाळी पाच-साडेपाचच्या सुमारास जुन्या मनपा कार्यालयाजवळ येणा-या सवा-या रात्री साडेसातपर्यंत तेथे आलेल्या नव्हत्या. सवा-यांच्या मागे नवस बोलणारे मोर्चण घेऊन तसेच ताजियासह सहभागी होते.