पक्षातून होणाऱ्या कुचंबणेला कंटाळून पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर अशा मोहिते-पाटील कुटुंबियाने राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींमुळे सोलापूर जिल्ह्यत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. विखे-पाटील पुत्रापाठोपाठ मोहिते-पाटील कुटुंबियाने पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतल्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजपला ताकद मिळाली आहे.

‘उद्याची पिढी रोजगार हमी योजनेवर पाठवायची नसेल तर सोलापूर जिल्ह्य़ातील शेतीचे-पाण्याचे प्रश्न सोडवावे लागतील आणि आजच्या घडीला ती ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात असून सत्ता-पदांसाठी नव्हे तर हे प्रश्न सोडवण्यासाठी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी जाहीर केले. राष्ट्रवादीचे खासदार आणि ज्येष्ठ नेते विजयसिंह पाटील यांनीही त्यास पाठिंबा जाहीर केला.

माढा लोकसभा मतदारसंघातून पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याची विद्यमान खासदार व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांची मागणी होती. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने ती अमान्य केल्याने मोहिते-पाटील यांनी पुढील निर्णय घेण्यासाठी मंगळवारी दुपारी अकलूजमध्ये समर्थकांचा मेळावा बोलावला होता. त्यात समर्थकांनी मोहिते-पाटील यांना भाजपप्रवेशाचा निर्णय घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपप्रवेशाचा निर्णय जाहीर केला.

सत्ता व पदांसाठी नव्हे तर या भागातील शेती-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय निर्णय घ्यावा लागणार आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी खासदार झाल्यानंतर पक्ष सत्तेत नसताना पंढरपूर-फलटण रेल्वेमार्गाचा प्रलंबित प्रश्न तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या मदतीने सोडवला. तर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात मदत केली. याउलट मोहिते-पाटील यांनी सत्तेत असताना या भागातील शेती-पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी योजना मांडल्या असतानाही त्यास प्रतिसाद मिळाला नाही. शेती-पाण्याच्या अडचणीमुळे ग्रामीण भागात बेरोजगारी वाढत असून आपल्या पुढच्या पिढय़ा रोजगार हमी योजनेवर जायच्या नसतील तर शेती-पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा. तुमच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे राहू असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता मुंबईत भाजप प्रवेश करणार असल्याचे रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केले. त्यानंतर भाषणाला उभे राहिलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह यांच्या मतांशी शंभर टक्के सहमत असल्याचे जाहीर करत भाजप प्रवेशाला संमती दिली.

मोहिते- पाटील आणि राष्ट्रवादीत कटुता वाढली होती

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील हे आधी शेकापमध्ये होते. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६०च्या दशकात मोहिते-पाटील यांना काँग्रेसमध्ये आणले होते. तेव्हापासून मोहिते-पाटील कुटुंबिय आणि काँग्रेसशी एकनिष्ठ होते. विजयसिंह मोहिते-पाटील हे सुरुवातीला माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील  यांचे निकटवर्तीय मानले जात. राज्याच्या राजकारणातील वसंतदादा गटाचे नेते मानले जाते. वसंतदादा पाटील यांच्या निधनानंतर विजयदादा हे शरद पवार यांच्या जवळ गेले. पुढे विजयदादा हेपवार यांचे निकटवर्तीय  झाले. छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर पवारांनी उपमुख्यमंत्रीपदी विजयदादांना संधी दिली होती. २००४ मध्ये पुन्हा सत्ता मिळाल्यावर विजयदादांना हे पद मिळाले नव्हते. पुढे विजयदादांच्या गटाचे राष्ट्रवादीतूनच पद्धतशीरपणे खच्चीकरण सुरू झाले. मोहिते-पाटील यांच्या कुटुंबियांमध्येही वाद निर्माण झाले. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या खासदारकीची मुदत संपल्यावर त्यांना संधी नाकारण्यात आली. शरद पवार हे राज्यसभेवर गेल्यावर माढा मतदारसंघातून विजयदादांना खासदारकी मिळाली होती. पण राजकीय पुनर्वसन होत नसल्याने रणजितदादा नाराज होते. यातूनच भाजप प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला.

खासदारांसह दोन आमदार उपस्थित

मोहिते-पाटील समर्थकांकडूनही राष्ट्रवादीशी घटस्फोट घेण्याबाबत मोठा दबाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अकलूजमध्ये खासदार मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न बंगल्याच्या आवारात समर्थकांची बैठक झाली. या बैठकीस स्वत: खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह त्यांच्याच गटाचे असलेले करमाळ्याचे शिवसेनेचे आमदार नारायण पाटील, माळशिरसचे आमदार हणमंत डोळस तसेच हजारो समर्थक उपस्थित होते.