पुण्यातील २०१४ मधील हिंसाचारात मोहसीन शेख या तरुणाच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाई याच्याविरोधात पुणे पोलिसांनी मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल केला. धनंजय देसाईची जामिनावर सुटका होताच कारागृह ते देसाईचे निवासस्थान अशी रॅली काढण्यात आली होती. ही रॅली काढल्याप्रकरणी धनंजय देसाई व त्याच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील हडपसर भागात पाच वर्षांपूर्वी झालेल्या मोहसीन शेख खून प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई याला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. शनिवारी दुपारी धनंजय देसाईची येरवडा कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर देसाई याच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून घोषणाबाजी केली. देसाई याला दुपारी साडेचारच्या सुमारास येरवडा कारागृहातून सोडण्यात आले. त्या वेळी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देसाई याच्या समर्थकांनी गर्दी केली होती. समर्थकांनी मोटारी तसेच दुचाकी वाहने कारागृहाच्या समोरील रस्त्यावर लावली होती. देसाई कारागृहातून बाहेर पडताच समर्थकांनी घोषणाबाजी सुरु केली. समर्थकांनी रस्ता अडवला. त्यानंतर देसाई एका मोटारीत बसला आणि कारागृहाच्या समोरील रस्त्याने निघून गेला.

देसाई याच्या गाडीवर समर्थकांनी पुष्पवृष्टी देखील केली होती. पोलिसांनी या भागातील कोंडी हटविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांवर कारवाई केली नव्हती.अखेर या रॅली प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) आणि मोटार वाहन अधिनियम या कायद्याअंतर्गत धनंजय देसाई आणि त्याच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.