यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थिनीवर शाळेतील दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर पडसाद गुरुवारी यवतमाळ शहरात उमटले. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आणि काही मोर्चेकऱ्यांनी वीणादेवी दर्डा नर्सरी शाळेवर दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे आणि यवतमाळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.  दोन्ही शाळेभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दोन्ही शाळा जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीकडून चालवल्या जातात. पोलिसांनी या प्रकरणी कालच दोन शिक्षकांना अटक केली असून, यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर अशी त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर व्यवस्थापनाने दोन्ही शिक्षकांना कामावरून तातडीने बडतर्फ केले आहे.
शाळेत शिकणाऱ्या एका मुलीला पोटात दुखायला लागल्यावर तिने आपल्या पालकांना त्याबद्दल माहिती दिली. वैद्यकीय तपासात संबंधित मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
शिक्षकांच्या घृणास्पद कृत्याविरोधात यवतमाळकर एकजुटीने रस्त्यावर उतरले. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावर शहरातील अनेक डॉक्टर, वकील, अभियंते आणि सर्व समाजातील लोक सहभागी झाले होते. दरम्यान, शहरात आणखी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.