राज्य शासनाच्या टाळेबंदीला विरोध करत खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात भीक मांगो आंदोलन करत जमवलेले साडेचारशे रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केले होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भीक मांगो आंदोलनातील रोकड न स्वीकारता एका ओळीचे पत्र लिहून ते साडेचारशे रुपये पुन्हा मनीऑर्डरद्वारे खासदार उदयनराजेंच्या राहत्या पत्त्यावर पाठवून दिले आहेत.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने वीकेंड लॉकडाउन जाहीर केला होता. शासनाच्या आदेशात सुधारणा करत प्रशासनाने अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. प्रशासनाच्या आदेशाचा निषेध नोंदवत खासदार उदयनराजेंनी शनिवारी (दि.१० एप्रिल) पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर पोत्यावर बैठक मारत ‘भीक मांगो आंदोलन’ केले होते. आंदोलनावेळी उदयनराजेंनी सरकारवर टीका करत आपला संताप व्यक्‍त केला होता. यावेळी त्यांनी थाळी फिरवत उपस्थितांकडून पैसे देखील जमा केले होते. भीक मांगो आंदोलनातून जमा केलेली साडेचारशे रुपयांची रोकड त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एका तहसीलदारांकडे सुपूर्द केली होती. एवढंच नाही तर या वेळी त्यांनी टाळेबंदी मागे घ्यावी लागेल अन्यथा असंतोषाचा भडका उडेल व त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला होता.

…तर मी पैसे खाणाऱ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं; उदयनराजेंचा ‘लॉकडाउन’विरोधात एल्गार

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ही रोकड कायदेशीररित्या स्वीकारता येणार नसल्याचे एका ओळीचे पत्र लिहून ते ४५० रुपये पुन्हा मनीऑर्डरद्वारे खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर पाठविले आहेत. यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया समजू शकली नाही.