राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव वापरून वेगवेगळय़ा संघटना तयार करून, त्यामाध्यमातून ‘अर्थ’पूर्ण उद्योग करणाऱ्या कथित कार्यकर्त्यांचा सध्या चंद्रपूर जिल्हय़ात सुळसुळाट झाला आहे. अशाच एका प्रकरणात पक्षाच्या मुंबईतील नेत्यांनी पोलिसात तक्रार करण्याचा दम देताच एका कार्यकर्त्यांवर माफीनामा लिहून देण्याची वेळ आली आहे. दरम्यान असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, असे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी  मुंबईतून ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
पक्ष स्थापनेच्या दिवशीपासून राष्ट्रवादी काँग्रेसला या जिल्हय़ात गटबाजीचे ग्रहण लागले आहे. पक्ष वेगवेगळय़ा गटात विभागला गेला असल्यामुळे त्याचा फायदा अनेकजण घेत आहेत. थेट रत्नागिरीवरून येथे आलेल्या एका कार्यकर्त्यां महिलेने कामगारांच्या क्षेत्रात पक्षाची बांधणी करायची आहे असे सांगत वेगवेगळय़ा उद्योगांमध्ये संघटना स्थापन करण्याचा सपाटा सुरू केला आहे. वरिष्ठांचे आशीर्वाद आहेत असे सांगणाऱ्या या महिलेने काही ठिकाणी आंदोलने करून उद्योगांकडून खंडणी वसुलीचा प्रकार सुरू केला आहे. या जिल्हय़ात उद्योगांची संख्या भरपूर असल्याने त्यात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. असे अपघात घडले की मृत कामगाराच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी करून स्वत:ची पोळी शेकून घेण्याचा प्रकार ही महिला व तिचे काही साथीदार उघडपणे करत असतात.
एका गटाने या संदर्भात मुंबईत तक्रार केली की लगेच दुसऱ्या गटाचा आधार घ्यायचा असा उद्योग या महिलेने चालवला आहे. हे बघून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणवून घेणारे सोमू येलचेलवार यांनी येथे राष्ट्रवादी क्रीडा संघटना व राष्ट्रवादी सिक्युरीटी फोर्स या दोन संघटनांची स्थापना केली. या संघटनांच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचा उद्योग येलचेलवार यांनी सुरू केला होता. या संघटनांचा पक्षाशी काहीही संबंध नसताना त्या पक्षाशी संबंधीत आहे असे उद्योगांच्या वर्तुळात भासवून वर्गणी वसूल करण्याचा उद्योग या कार्यकर्त्यांने सुरू केला होता. याप्रकरणाची तक्रार थेट मुंबईत झाल्यानंतर पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी येलचेलवारांना दोन दिवसापूर्वी मुंबईत बोलावून घेतले. खंडणी वसुलीचा हा उद्योग थांबवा अन्यथा पोलिसात तक्रार करण्यात येईल असा दम येलचेलवारांना यावेळी देण्यात आला. अखेर येलचेलवारांनी लेखी माफीनामा सादर करून स्वत:ची सुटका करून घेतली.
गर्जे यांच्या निर्देशावरून पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी एक पत्रपरिषद घेऊन येलचेलवार यांच्या संघटनांशी पक्षाचा काहीही संबंध नाही असे जाहीर केले आहे. येलचेलवार यांनी या संघटनांचे कामकाज तातडीने बंद करण्याचे आश्वासन प्रदेश पदाधिकाऱ्यांना दिले असून आता त्यांनी त्याचे पालन करावे असे आवाहन वैद्य यांनी केले. येलचेलवार हे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा नाहीत. त्यांच्या पत्नीने महापालिकेच्या निवडणुकीत बसपकडून निवडणूक लढली होती. याकडेही वैद्य यांनी लक्ष वेधले. पक्षाचे कोणतेही मंत्री आले की त्यांना निवेदन देतांनाची छायाचित्रे काढायची व नंतर त्याचा वापर संघटनेच्या फलकावर करून पक्षाचा कार्यकर्ता आहे, असे भासवायचे असा प्रकार येलचेलवार व इतर काही कार्यकर्ते करीत असल्याचे वैद्य यांचे म्हणणे आहे.
दरम्यान येलचेलवार यांनी आपण पक्षाचे कार्यकर्ते असून वैद्य यांनी पक्ष हायजॅक केला असा आरोप केला आहे. यासंदर्भात गर्जे यांच्याशी संपर्क साधला असता सध्या माफीनाम्यावर हे प्रकरण थांबवण्यात आले आहे. याच जिल्हय़ात आणखी काही जण अशाच प्रकारे उद्योग करत असल्याचे लक्षात आले असून त्यांनाही समज देण्यात आली आहे असे ते म्हणाले.