महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षिकेच्या हातातील एक लाख रुपये रक्कम असणारी पर्स माकडाने हिसकावून नेल्याने एकच गोंधळ उडाला. मात्र, श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्सच्या जवानांनी खोल दरीत उतरून पळवलेली पर्स शोधली व शिक्षिकेला परत केली. त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

बेळगाव येथील गजानन भातखंडे हायस्कुलची सहल महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आली हाती. ऑर्थरसिट पॉईंट पाहिल्यानंतर सहल एलिफिस्टन पॉईंट येथे आली. या ठिकाणी सर्वजण पर्यटनाचा आनंद घेताना अचानक एका शिक्षिकेच्या हातातील पर्स माकडाने पळवून नेली. शिक्षिका घाबरल्या आणि मोठी रक्कम पर्समध्ये असल्याने त्या घाबरून खाली बसल्या. माकडाला हाकलण्याचा प्रयत्न विद्यार्थी व इतर शिक्षकांनी केला. पण, तोपर्यंत पर्स घेऊन माकड झाडावरून खोल दरीत गायब झाले. सर्वांची धावपळ सुरू झाली पण, काहीच उपयोग झाला नाही.

त्यानंतर पर्समध्ये विद्यार्थ्यांचे सहलीचे एक लाख रुपये असल्याने शिक्षिका रडायला लागल्या. शेजारील व्यावसायिक आनंद पवार यांना सहकारी शिक्षकांनी ही माहिती दिली. पवार यांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्स जयवंत बिरामणे व अनिल लांगी यांना माहिती दिली. ते दोघेही घटनेच्या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता हजर झाले. ट्रेकर्स शंभर फुट दरीत उतरले. खाली पोचल्यावर त्यांना पाचशे व शंभर रुपयांचा नोटांचे बंडल सापडले.

अंधार पडल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी हे ट्रेकर्स पुन्हा दरीत उतरले. अगदी खोल दरीत गेल्यावर त्यांना दोन हजार रुपयांच्या नोटांचा बंडल सापडला. नंतर आनंदवन भुवन येथे सहल विसावली होती. तेथील मिलिंद भटकांडे यांच्या माध्यमातून शिक्षकांना संपर्क करून हे एक लाख रुपये बिरामने व लांगी यांनी ताब्यात दिले. त्यामुळे सर्वानीच मुलांचे पैसे सापडल्याने सुटकेचा निश्वास सोडला. शाळेच्या शिक्षकांनी धाडसी ट्रेकर्सचे आभार व्यक्त केले. क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांकडूनही बिरामने व लांगी यांचे कौतुक होत आहे.