News Flash

राज्यात पावसाची सरासरी

अकोला आणि यवतमाळ जिल्हे वगळता सर्वत्र समाधानकारक

अकोला आणि यवतमाळ जिल्हे वगळता सर्वत्र समाधानकारक

मुंबई, पुणे : येत्या आठवडय़ात पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार असून यंदाच्या मोसमात राज्यात अकोला आणि यवतमाळ वगळता सर्वत्र पावसाने सरासरी गाठली. पावसाच्या परतीच्या प्रवासासाठी पूरक असे वातावरण तयार  होत असल्याने २८ सप्टेंबरपासून त्याचा परतीचा प्रवास सुरु होण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून राज्यातील अनेक भागांत जोरदार वीजांसह पाऊस कोसळला. गेल्या आठवडय़ातील पावसाने कोकणात भातशेतीचे नुकसान झाले. नाशिकमधील कमी पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागांतही यंदा पुरेसा पाऊस पडला.  मराठवाडा आणि नगरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा पडला असून गेल्या काही दिवसांपासून मराठवाडय़ात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.  औरंगाबाद  सांगली-कोल्हापूरमध्येही अतिरिक्त पावसामुळे धरणातून पाणी विसर्ग करणे भाग पडले. यंदा विदर्भातील काही भाग वगळता राज्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला.

गेल्या २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. शनिवारी दिवसभरात मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे १२ मिलिमीटर, सांगलीत पाच मि.मी., कोल्हापुरात ०.४ मि.मी., नाशिक आणि साताऱ्यात प्रत्येकी ०.३ मि.मी., तर सोलापुरात दोन मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. कोकणात के वळ रत्नागिरीमध्ये पाच मि.मी., मराठवाडय़ात औरंगाबादमध्ये दोन मि.मी., तर विदर्भात नागपुरात तीन मि.मी. पावसाची नोंद झाली. पुणे, नगर, जळगाव आणि मालेगाव, मुंबई, अलिबाग, डहाणू, परभणी, नांदेड, बीड तर विदर्भात पावसाची नोंद करण्यात आली नाही. दिवसभरात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३४.१ अंश सेल्सिअस, तर सर्वाधिक नीचांकी महाबळेश्वर येथे १६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

दोन दिवस तुरळक..

* रविवारी कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

* सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

* मंगळवारी (२९ सप्टेंबर) राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

* मंगळवारी आणि त्यानंतर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पर्जन्यभान..

या मोसमात अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्य़ांनी मात्र अद्याप पावसाची सरासरी गाठलेली नाही. मुंबई शहर, मुंबई उपनगर, अहमदनगर आणि औरंगाबाद या जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा ६० टक्कय़ाहून अधिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, नाशिक, जळगाव आणि धुळे या जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के  अधिक पावसाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात सरासरीइतका पाऊस पडला.

वातावरणात बदल..

राज्यातील अनेक भागांत आता पावसाचा जोर ओसरत चालला आहे. त्यामुळे वातावरणात झपाटय़ाने बदल होत आहे. तसेच मध्य महाराष्ट्र ते कोमारीन, कर्नाटक ते केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने तुरळक ठिकाणी काही प्रमाणात दुपारनंतर ढग जमा होत आहेत. शनिवारी मुंबईसह राज्यात अनेक भागांत दिवसभर उन होते.

परतीचा प्रवास..  राजस्थानच्या वायव्येपासून पावसाचा परतीचा प्रवास २८ सप्टेंबरला सुरु होईल.  पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या आठवडय़ात राज्यातील पाऊस पूर्णपणे कमी होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 2:08 am

Web Title: monsoon 2020 maharashtra received average rainfall in 2020 zws 70
Next Stories
1 विस्मृतीत गेलेल्या गडाचा गिर्यारोहकांकडून शोध
2 आश्रमाच्या पैशावर डोळा ठेवून गुंडगिरी -विद्रोही
3 मानधन वाटपाचा नागपूर पॅटर्न राज्यभर लागू