मृग नक्षत्राचा मुहूर्त साधत मान्सून महाराष्ट्रात झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह तळकोकणात सोमवार सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. हवेतील बाष्पाचे प्रमाण, वाऱ्याची दिशा व वेग यांच्या निकषांनुसार तसेच सकाळपासून नोंदवल्या गेलेल्या पावसाच्या आधारे गोवा आणि तळकोकणात मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.
उकाड्याने हैराण झालेल्या कोकणवासियांना मान्सूनच्या आगमनाने दिलासा मिळाला आहे. येत्या ४८ तासांत कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. मात्र अरबी समुद्रात सध्या घोंगावत असलेल्या ‘अशोबा’ नावाच्या चक्रीवादळामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. मुंबईपासून ६५० किलोमीटर व वेरावळपासून ७०० किलोमीटर दूर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने अरबी समुद्रात हे वादळ निर्माण झाले असून ते उत्तरेला गुजरातकडे सरकण्याचा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.