कमी दाबाचे क्षेत्र पूर्व किनारपट्टीला थडकले

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी संध्याकाळी पूर्व किनारपट्टीवर थडकल्याने राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात रविवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने रविवारी व सोमवारी जोरदार पाऊस येऊ शकेल.

गेल्या महिन्याभरात रविवारचा मुहूर्त साधत पाऊस सक्रिय होत असल्याचे अनेकदा दिसले आहे. यावेळी पुन्हा एकदा आठवडय़ाच्या अखेरीस पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. हे क्षेत्र शनिवारी संध्याकाळी ओडिसा आणि पश्चिम बंगाल यादरम्यान थडकले. त्यामुळे या संपूर्ण भागात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचप्रमाणे रविवारी विदर्भातही काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. हवामानातील या घडामोडींमुळे विदर्भासह मराठवाडय़ातही मंगळवापर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाला पूर्व किनारपट्टीवरील या घडामोडींमुळे बळ मिळाले असून त्याच्या परिणामामुळे संपूर्ण किनारपट्टीत बहुतांश भागात पावसाच्या सरी सुरू आहेत. रविवारी व सोमवारी त्यात वाढ होईल. पूर्व व पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र असल्यास उत्तर महाराष्ट्रात म्हणजे धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव येथे भरपूर पाऊस पडतो. रविवारी व सोमवारी या परिसरात काही ठिकाणी मुसळधार वृष्टी होऊ शकते. दक्षिणेला सातारा आणि औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथेही सोमवारी पावसाच्या जोरदार सरी येण्याचा अंदाज मुंबई हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पालघरमधील जव्हार येथे १४७ मिमी झाली. मुंबईत सांताक्रूझ येथे १८ मिमी तर कुलाबा येथे अवघा ६ मिमी पाऊस पडला.