विदर्भात जोरदार, मराठवाडय़ात हलक्या पावसाचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी पावसासाठी सध्या पोषक स्थिती असल्याने राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून, कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार, तर मराठवाडय़ात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात सध्या श्रावणधारा बरसत आहेत. घाटमाथा परिसर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही चांगला पाऊस पडत असल्याने धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा होतो आहे. त्याचप्रमाणे पिकांसाठीही हा पाऊस पोषक ठरत आहे.

गेल्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात अनेक ठिकाणी आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी हलका पाऊस पडला. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

पाऊसमान : गेल्या २४ तासांत नोंदविलेला पाऊस (मि. मी.) पुढील प्रमाणे- कोकण विभागातील कर्जत, संगमेश्वर-देवरुख ७०, खेड, मंडणगड ६०,चिपळूण, महाड ५०, जव्हार, माथेरान, राजापूर ४०, अलिबाग.

मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर  ९०, राधानगरी, शाहूवाडी ७०, गगनबावडा, इगतपुरी, लोणावळा (कृषी) ६०, चांदगड ५०, पौड, मुळशी, शिराळा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर ३०, मराठवाडय़ातील हिमायतनगर १०. विदर्भातील साकोली ४०, कोरची, कुही, सडक अर्जुनी ३०, भंडारा,सालेकसा, वाशिम २०. घाटमाथा परिरातील कोयना (पोफळी) ११०, ताम्हिणी, दावडी, शिरगाव ९०, अम्बोणे ८०, डुंगरवाडी ७०, कोयना (नवजा), लोणावळा (टाटा) ६०.